महानगरपालिकेच्या रुग्णालयात मुदतीतील औषधांचेच वितरण

  • नवी मुंबई महापालिका प्रशासनाचे म्हणणे
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, ४ जुलै २०१९:

स्थायी समिती सभापती श्री. नविन गवते यांनी माता बाल रुग्णालय, बेलापूर येथे केलेल्या पाहणी दौ-यामध्ये  मध्यवर्ती औषध भांडार गृहास दिलेल्या भेटीत एका खोलीत मुदत बाह्य औषधे विनावेष्टन आढळून आल्याचे वृत्त विविध वृत्तपत्रांत प्रसिध्द झाले आहे.  वास्तविकत: राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) ह्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेस विविध प्रकारची औषधे २०१५-१६ मध्ये प्राप्त झाली होती. प्राप्त झालेल्या औषधांपैकी Tab.CHLOROQUINE PHOSPHATE I.P. २५० mg ह्या औषधांचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त प्रमाणात करण्यात आला होता. महानगरपालिकेच्या मध्यवर्ती औषधगृहामार्फत ही औषधे नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांना व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना मागणीनुसार वितरीत करण्यात येत होती. रुग्णालयांत व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही औषधे मुदतबाह्य होण्यापूर्वी वापरण्यात येत होती, असे महापालिका प्रशासनाने कळविले आहे.

  • औषध पुरवठा जास्त झालेल्या मुदतबाह्य होणाऱ्या औषधसाठ्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालयतील खरेदी कक्षाचे सह संचालक यांना विचारणा करण्यात आली होती. तथापि याबाबत कोणतेच अभिप्राय प्राप्त न झाल्यामुळे मुदतबाह्य औषधसाठा नष्ट करणेबाबत मे. मुंबई वेस्ट मॅनेजमेंट यांना कळविण्यात आले होते. हा मुदतबाह्य औषध साठा माता बाल रुग्णालय बेलापूर येथील औषध गृहात मुदतबाह्य औषधे ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खोली क्रमांक २४ मध्ये स्वतंत्रपणे ठेवण्यात आला होता.

सदरचा साठा महानगरपालिका रुग्णालयांना व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरीत करण्यात आलेला नाही. हा साठा स्ट्रीप्समध्ये असल्यामुळे गोळ्या वेष्टनातून वेगळ्या करुन मे. मुंबई वेस्ट मॅनेजमेंट यांना त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी देण्याची कार्यवाही सुरु होती. याच काळात २ जुलै रोजी स्थायी समिती सभापती यांनी बेलापूर माता बाल रुग्णालयास भेट दिली असता मुदतबाह्य औषधे ठेवण्यासाठी वापरण्यात येणारी खोली क्रं. २४ त्यांनी उघडण्यास सांगितली ज्याठिकाणी मुदतबाह्य औषधसाठा नष्ट करण्यासाठी ठेवण्यात आला होता, असे महापालिकेने कळविले आहे.

====================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा