अर्थसंकल्पातून निवडणुकीच्या तोंडावर नाखूष क्षेत्रांना खूश करण्याचा केविलवाणा प्रयत्न – जयंत पाटील

  • अर्थमंत्र्यांनी गोपनीयतेच्या शपथेचा भंग केल्याचा आणि सभागृहाचा अपमान केल्याचाही आरोप
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई 18 जून  2019:

 या अर्थसंकल्पात कोणत्याही क्षेत्राच्याबाबतीत गंभीरपणे तरतूद केलेली दिसत नाही. केवळ निवडणुकीच्या तोंडावर आपल्यावर नाखूष अशा क्षेत्रांना खूश करू पाहण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी केली आहे. 

  • अर्थमंत्र्यांनी मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा अपुरा आणि अर्धवट आहे. कोणत्याही क्षेत्राच्या बाबतीत गंभीरपणे तरतूद केलेली दिसत नाही.  दैनंदिन कामकाज असणाऱ्या गोष्टींचाही अर्थसंकल्पीय भाषणात उल्लेख करून प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला आहे.ज्या गोष्टी गेली पाच वर्षे करणे अपेक्षित होत्या त्यांची घोषणा आत्ता करून जनतेची दिशाभूल करण्याचा हा डाव आहे असा आरोपही पाटील यांनी केला.
  • या अर्थसंकल्पात रचनात्मक असे काहीच नाही. महिला, आदिवासी, दलित आणि अल्पसंख्याक यांच्या भल्यासाठी इथे काहीही नाही. केवळ रस्ते आणि पूल बांधणे म्हणजे विकास कसा? आमच्या काळात मांडलेले अंतरिम अर्थसंकल्प आणि आत्ताचा अंतरिम अर्थसंकल्प यांची तुलना केली तर हा अर्थसंकल्प किती बोगस आहे हे लक्षात येईल, असेही पाटील म्हणाले.
  • अर्थसंकल्प हा अत्यंत गोपनीय दस्तऐवज असतो मात्र हा अर्थसंकल्प आधीच फुटलेला होता, कारण अर्थमंत्री सभागृहात अर्थसंकल्प सादर करत असताना अर्थमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर अकाउंटवर अगदी काही क्षणात ग्राफिक्स इमेज पोस्ट होत होत्या, याचा अर्थ हे ग्राफिक्स आधीच तयार करून ठेवले होते असेही पाटील म्हणाले.
  • अर्थसंकल्प आधीच फोडून अर्थमंत्र्यांनी त्यांच्या गोपनीयतेच्या शपथेचा भंग तर केला आहेच पण हा सभागृहाचा देखील अपमान आहे असाही आरोप  पाटील यांनी केला.

==================================================

इतरही बातम्यांचा मागोवा