स्थानिक महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकाराची योजना
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई, 29 मे 2019 :
राज्यात बोर, मेळघाट, पेंच, नवेगाव-नागझिरा, सह्याद्री आणि ताडोबा- अंधारी असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. यापैकी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ३०, पेंच व्याघ्र प्रकल्पात १२ आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ५ अशा एकूण 47 महिला गाईड कार्यरत आहेत.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात तसेच वनालगतच्या गावांमध्ये स्थानिक महिलांना विविध व्यवसाय- उद्योगाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे सक्षमीकरण केले जात आहे. त्याचाच हा एक भाग आहे. अचूक आणि परिपूर्ण माहितीने समृद्ध गाईड आलेल्या पर्यटकाला जंगलभ्रमंतीचा उत्तम आनंद देऊ शकतो हे विचारात घेऊन या वन पर्यटक मार्गदर्शकांना प्रशिक्षण दिले गेले आहे.
पर्यटनाला आलेल्या पर्यटकांना जंगल भ्रमंतीचे नियम समजून सांगणे, जंगलात गेल्यानंतर कसे वागायचे हे शिकवणे, व्याघ्र प्रकल्पाची माहिती देताना वाघांबरोबरच इतर वन्यजीव आणि वृक्षसंपदेने संपन्न असलेल्या वनाची ओळख करून देणे, वन्यजीवांची माहिती देणे, त्या जंगलातील पशू पक्षी आणि प्राण्यांचा असलेला वावर सांगणे यासारख्या गोष्टींमधून पर्यटकाला पर्यटनाचा पुरेपूर आणि भरपूर आनंद मिळेल अशी वर्तणुक करणे यादृष्टीने या महिला पर्यटन मार्गदर्शकांना तयार करण्यात आले आहे.
पक्ष्यांचे संगीत आणि वाघाच्या डरकाळ्यांनी व्याघ्र प्रकल्पातील डोंगर रांगा जिवंत होतात असं म्हटलं जातं. याच डोंगर रांगात वसलेल्या, व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात, वनालगतच्या गावात राहणाऱ्या स्थानिक लोकांनी ही वने जिवंत ठेवण्यासाठी आणि वाढण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. अशावेळी या लोकांना रोजगाराच्या पर्यायी संधी उपलब्ध करून देणे, त्या दृष्टीने आवश्यक असलेले प्रशिक्षण देणे, अत्यावश्यक पायाभूत सुविधा या गावांमध्ये उपलब्ध करून देणे आणि त्यांचे वनांवरचे अवलंबित्व कमी करणे यासाठी वन विभागाने पुढाकार घेतला आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेतून या कामाला गती देण्यात आली आहे. पर्यटक मार्गदर्शक, महिलांसाठी शिलाई मशिन युनिट, दुभत्या पशुधनाचे वाटप, होम स्टे, वाहनचालक, ऑटोमोबाईल प्रशिक्षण अशा विविध माध्यमातून स्थानिकांचे सक्षमीकरणाचे काम सुरु आहे. यासाठी आय.टी.सी सारख्या अनेक संस्थांची मदत घेतली आहे.