पळ काढणारे चौकीदार नव्हे तर चोर असतातः खा. अशोक चव्हाण

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

मुंबई, १ एप्रिल २०१९:

भाजप देशपातळीवरती ‘मै भी चौकीदार’ नावाने अभियान चालवत आहे. परंतु कोणत्याही आरोपाला संवेदनशिलतेने उत्तर देण्याचे आत्मबळ भारतीय जनता पक्षामध्ये राहिलेले नाही. भ्रष्टाचार आणि नैतिकतेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर न देता भारतीय जनता पक्ष पळ काढत आहे. पळ काढणारे चौकीदार नव्हे तर चोर असतात, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

  • यासंदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, सत्तेत आल्यापासून भारतीय जनता पक्ष जनता, विरोधी पक्ष, माध्यमे आणि न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नांपासून पळ काढत आहे. राज्याच्या मंत्रीमंडळातील दिलीप कांबळे या मंत्र्यांवर लाच घेतल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल आहे. लाचखोरीबद्दल त्यांची हकालपट्टी करण्याचे सोडाच, परंतु त्याची दखल घेण्याची नैतिकताही भाजपमध्ये राहिलेली नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्यांच्या चौकशीतील दिरंगाई व अकार्यक्षमतेबद्दल उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उभे केल्यानंतर याची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा देणे तर सोडाच परंतु त्याला उत्तर देण्याचीही हिम्मत सरकारमध्ये नाही. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर न दिल्याने थोड्या दिवसांनी प्रश्न विचारणे बंद होईल आणि जनतेची स्मरणशक्ती कमजोर असते असे गृहीत धरून जनता हे विसरून जाईल. त्यानंतर पारदर्शकता व नैतिकतेचा टेंभा मिरवायला आपण मोकळे अशी कुटील निती भारतीय जनता पक्ष गेली काही वर्ष वापरत आला आहे,असा आरोपही चव्हाण यांनी केला आहे.

===================================================

इतर बातम्यांचाही मागोवा