अनधिकृत धार्मिक स्थळे धोकादायक इमारतींवर कारवाई करा

  • ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
ठाणे,१९मार्च २०१९:

महापालिकेच्या विविध करांची वसुली करण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याबरोबरच शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे, अनधिकृत बांधकामे, धोकादायक इमारती यावर कारवाई करण्याचे आदेश आज महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व अधिका-यांना दिले. दरम्यान आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही जयस्वाल यांनी यावेळी सर्व अधिका-यांना दिल्या.

महापालिकेची मालमत्ता कराची वसुली, पाणी बिल वसुली व इतर वसुलीबाबतची आढावा बैठक आज नागरी संशोधन केंद्र ठाणे येथे संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.

  • महापालिकेची वसुली प्राधान्याने करावी. त्याबाबत कोणतेही कारण ऐकले  जाणार नाही असे स्पष्ट करून थकबाकीची वसुलीही करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर शहरातील अनधिकृत प्रार्थनास्थळे, आणि अनधिकृत बांधकामांवरही कारवाई करण्याचे आदेश जयस्वाल यांनी दिले.
  • धोकादायक इमारतींच्या बाबतीत बोलताना त्यांनी सर्व कार्यकारी अभियंता यांनी प्रभाग समितीनिहाय धोकादायक इमारतींची पाहणी करून १५ एप्रिलपर्यंत प्राथमिक यादी सादर करण्याच्या सूचना दिल्या.
  • दरम्यान लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने शहरातील सर्व अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर्स तसेच अनधिकृत राजकीय बॅनर्स शहरात कुठेही लागणार नाही याची सहाय्यक आयुक्त यांनी दक्षता घ्यावी तसेच निवडणुकीच्या काळात शहर स्वच्छ ठेवण्याच्याबाबतीत सर्व स्वच्छता निरीक्षक यांनी खबरदारी घ्यावी असेही जयस्वाल यांनी यावेळी स्पष्ट केले.

========================================================

इतर बातम्यांचाही मागोवा