महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचे आदेश
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
ठाणे, 13 नोव्हेंबर 2018:
दिवाळीमध्ये महापालिकेची परवानगी न घेताच अनधिकृतपणे होर्डिंग्ज आणि बॅनर्स लावणा-यांविरोधात न्यायालयीन अवमान याचिका दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अतिक्रमण विभागाला दिले. दरम्यान अतिक्रमण निष्कासन फी वसुल करण्याबाबत हयगय चालणार नाही असे कडक निर्देशही त्यांनी दिले आहेत.
ठाणे शहरामध्ये दिवाळीच्या कालावधीत अनधिकृत होर्डिंग आणि बॅनर्स लावणा-यांविरोधात न्यायालयीन अवमान याचिका दाखल करण्याबरोबरच अनधिकृतपणे होर्डिंग्ज आणि बॅनर्स लावणा-यांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश सर्व सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले आहेत.
दरम्यान ज्यांची निवासी घरे किंवा व्यावसायिक आस्थापना तोडल्या असतील त्यांची यादी तपासून त्यांच्याकडून किती निष्कासन फी वसुल करावी याचे धोरण ठरविण्याबाबतचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. समाज विकास विभागाकडून करण्यात आलेले बायोमेट्रीक्स तसेच स्थावर मालमत्ता विभागाकडून रेंटल हौसिंगमध्ये घर देण्यात आलेल्या लोकांची यादी तपासून खातरजमा करण्यात यावी असेही आयुक्त जयस्वाल यांनी स्पष्ट केले. ही यादी कोणत्याही परिस्थितीत एका आठवड्यात बनविण्यात यावी आणि त्यानंतर वसुलीची कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
======================================================================================================================================
इतर बातम्यांचा मागोवा
नवी मुंबई शहरासाठीच्या योजना- महापालिका आयुक्त डॉ.रामास्वामी यांची विशेष मुलाखत