- नेरूळ- खारकोपर रेल्वेसेवा सुरु करण्याची तारीख निश्चित नाही – मध्य रेल्वे
अविरत वाटचाल न्यूज
नवी मुंबई, २५ ऑक्टोबर २०१८
नेरूळ- उरण रेल्वेमार्गावरील नेरूळ ते खारकोपर या पहिल्या टप्यासाठी आज विशेष लोकल चालवून स्पीड ट्रायल घेण्यात आली. या स्पीड ट्रायलसाठी ओव्हरहेड लाईनवर २५००० व्ही इतका विद्युत दाब सुरू करण्यात आला होता. सध्या या मार्गावरील चाचण्या सुरु असून रेल्वेसेवा सुरु करण्याबाबत तारीख निश्चित केलेली नाही. मात्र लवकरच नेरुळ-खारकोपर रेल्वेसेवा सुरु करण्याचा प्रयत्न असेल, असे मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांनी सांगितले.
- सिवूडस् ते खारकोपर या पहिल्या टप्प्याचे अंतर 12 किमी असून पुढे खारकोपर ते उरण हे अंतर 15 किमी आहे. एकूण 27 किमीचे हे रेल्वे जाळे विकसित करण्यासाठी सिडको व रेल्वे विभाग यांच्याकडून अनुक्रमे 67:33 टक्के अशा प्रमाणात गुंतवणूक करण्यात येत आहे. एकूण 1782 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प असून यात 4 उड्डाण पूल, 15 सबवे मार्गिका, रस्ते यांचा समावेश आहे.
- नेरूळ ते खारकोपर या मार्गावर पाच स्थानके उभारण्यात आली आहेत. नेरूळ, सीवूडस्, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर अशी ही स्थानके आहेत. त्यापैकी तरघर रेल्वे स्थानकाचे काम सुरू असून पहिल्या टप्प्यात या स्थानकावर उपनगरीय रेल्वे थांबणार नाही. सध्या खारकोपरपर्यंत रेल्वे सुरू होणार आहे. सिडकोतर्फे करण्यात येणारी कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये नेरुळ-खारकोपर गाडी सुरु होण्याची शक्यता सिडकोचे एमडी लोकेश चंद्र यांनी मागील एका पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यामुळे साऱ्यांचेच या नव्या रेल्वे सेवेकडे लक्ष लागून राहीले आहे.
नेरुळ-खारकोपर रेल्वेसेवेबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना सिडको एमडी लोकेश चंद्र
गेल्या काही दिवसांपासून नेरुळ-खारकोपरदरम्यानच्या रेल्वे मार्गावर विविध चाचण्या घेण्यात येत आहेत. आज या मार्गावरील उच्च दाबाचा विद्युत प्रवाह सुरू करून रिकामी रेल्वे गाडी चालवून स्पीड ट्रायल घेण्यात आली. अशाप्रकारे आणखी काही चाचण्या होतील. सुरक्षेबाबतची सर्वतोपरी खबरदारी घेवूनच लवकरात लवकर ही सेवा सुरु करण्याचा मध्य रेल्वेचे प्रयत्न आहे. मात्र नेमकी तारीख अद्याप निश्चित झाली नसल्याचे जैन यांनी अविरत वाटचाल न्यूजशी बोलताना सांगितले.
दरम्यान, सिडकोतर्फे रेल्वे स्थानकांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. आज घेण्यात आलेल्या या चाचणीच्या अहवालावर आता हा मार्ग कधी सुरू होणार हे ठरणार आहे. आजच्या चाचणीमध्ये काही त्रुटी आढळल्यास ही चाचणी पुन्हा घेण्यात येईल. तसेच रेल्वे चालविण्याबाबतचा निर्णय मध्य रेल्वेतर्फे घेण्यात येईले, असे सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
======================================================================================================
मागील इतर बातम्यांचाही मागोवा
- शिवडी- न्हावा शेवा ट्रान्सहार्बर लिंक रोडच्या प्राथमिक कामाला सुरुवात
=======================================================================================================
- सोसायटयांच्या पुनर्वसनासाठी मार्गदर्शक माहिती आठवडाभरात जाहीर करणार
https://goo.gl/rxzGtM