- शेतकरी गटामार्फत 70 एकर क्षेत्रावर पहिलाच यशस्वी उपक्रम
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई, 24 ऑक्टोबर 2018:
पूर्व विदर्भातील पारंपरिक पद्धतीने भात शेती कमी उत्पादनामुळे किफायतशीर ठरत नसल्यामुळे कमी दिवसात जास्त उत्पादन देणाऱ्या भात पिकांच्या रोवणीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्यात प्रथमच औषधी गुणधर्म असलेल्या ‘ब्लॅक राईस’ (काळा तांदूळ) चे उत्पादन घेण्यात आले. विशेष म्हणजे जिल्ह्यातील 70 एकर क्षेत्रावर ‘ब्लॅक राईस’चा पहिलाच प्रयोग यशस्वी ठरला आहे. या धानाला मोठ्या प्रमाणात काळ्या लोंब्या(ओंबी) आल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे. संपूर्ण शेत काळ्या लोब्यांनी बहरले आहे.
- पारंपरिक भात पिकापासून 12 ते 15 क्विंटल प्रती हेक्टरी उत्पादन होते. त्यामुळे अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन वाणांना कृषी विभागाच्या आत्मातंर्गत ‘ब्लॅक राईस’ लागवडीचा प्रयोग जिल्ह्यातील रामटेक, मौदा, उमरेड, कुही, पारशिवनी व कामठी या तालुक्यातील निवडक शेतकरी गटाच्या माध्यमातून पहिल्यांदा 70 एकरामध्ये हा प्रयोग राबविण्यात आला.
- ‘ब्लॅक राईस’चे बियाणे छत्तीसगड राज्यातून मागविण्यात आले असून सेंद्रीय पद्धतीने भात उत्पादनाचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. या उपक्रमासाठी 10 बचत गटांना बियाण्यासह जैविक खते तसेच सेंद्रीय धानासाठी आवश्यक असणारे निंबोळी अर्कासह सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे या वाणावर किडीचा प्रादुर्भाव नसल्याचे सिद्ध झाले आहे.
- ‘ब्लॅक राईस’चे उत्पादन 110 दिवसात घेतल्या जात असल्याने दुसऱ्या पिकांसाठी जमीन उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पीक घेणे सुद्धा सहज शक्य झाले आहे.
- शेतातील धानाचे लोंबी बघता पारंपरिक धानापेक्षा निश्चितच जास्त उत्पादन होईल,असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
- शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून कृषी उत्पादन वाढीसाठी आत्मांतर्गत विविध उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना उत्पादनानंतर चांगला भाव मिळावा, यासाठी विक्री व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. ‘ब्लॅक राईस’च्या भरडणीसाठी सवलतीच्या दरावर राईस मिल सुद्धा देण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्प संचालक डॉ. नलिनी भोयर यांनी दिली.
- दैनंदिन भोजनात पांढरा, ब्राऊन तांदळाचा वापर नेहमीच करतो. परंतु ‘ब्लॅक राईस’(काळे तांदुळ) विषयीची माहिती नवीन आहे. फार वर्षापूर्वी राजघराण्यातील लोकांसाठी चीनमध्ये ब्लॅक राईस’ची लागवड केली जात होती. त्यामुळे या तांदळाचे Forbidden Rice असे ठेवण्यात आले. या तांदळातील वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असल्यामुळे युरोप व अमेरिकेपर्यंत प्रसार झाला आणि त्यावर संशोधन होऊन औषधी गुणधर्म असल्याचे सिद्ध झाले.
- भारतामध्ये ‘ब्लॅक राईस’ उत्तर-पूर्व राज्यामध्ये पिकविला जातो. स्वास्थ्यवर्धक अनेक गुणधर्म असल्यामुळे याला चांगली मागणी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी 10 बचत गटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच उत्पादनाला सुरुवात केली आहे. यामध्ये फायबर, मिनरल्स् (आर्यन व कॉपर) आणि उत्कृष्ट गुणवत्ता असलेले वनस्पतीयुक्त प्रोटीन आहे. या तांदळाच्या बाहेरील आवरणामध्ये सर्वात जास्त Anthocyanin Antioxident गुणधर्म आहेत. त्यामुळे कॅन्सरसह विविध आजारासाठी हा तांदूळ निश्चितच गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे.‘ब्लॅक राईस’ खाने आरोग्यवर्धक असल्यामुळे वॉलमार्टसह इतर सुपर बाजारमध्ये सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या काळ्या तांदळाला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे ‘ब्लॅक राईस’ हा पूर्व विदर्भातील शेतकऱ्यासाठी निश्चितच वरदान ठरणार असल्याची माहिती आत्माच्या प्रकल्प संचालक नलिनी भोयर यांनी सांगितले.
कामठी तालुक्यातील सेलू येथील निसर्गराजा सेंद्रीय शेतमाल उत्पादक स्वयंसहायता गटामार्फत दिनकर ठाकरे व अशोक कोकाटे यांनी प्रत्येकी एका एकरात ‘ब्लॅक राईस’ची रोवणी केली होती. पारंपरिक धानाऐवजी काळा तांदुळ कमी दिवसात व कमी खर्चात उत्पादन घेऊन आज चांगले आणि मोठ्या प्रमाणात लोंब्या आल्या आहेत. आता भातपीक कापणीवर आल्यामुळे संपूर्ण शेतात काळ्या लोंब्यांनी बहरले आहे. सेंद्रीय पद्धतीने धानाची लागवड केल्यामुळे रासायनिक खतांवर होणारा खर्चही कमी झाला आहे. ‘ब्लॅक राईस’साठी जैविक औषधी खते, निंबोळी अर्क व गांढूळ प्रकल्प सुद्धा कृषी विभागातर्फे उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ‘ब्लॅक राईस’ची बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्याचा संकल्पही बचत गटाच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
===================================================================================================
इतरही बातम्यांचा मागोवा
- एक धाव स्वच्छतेसाठी
इतर व्हिडिओ avirat vaatchal news या यु ट्युब चॅनलवर बघा.