नवी मुंबईत अडीच टन प्लास्टिक जप्त

महापालिकेची प्लास्टिक बंदीची कारवाई

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 11 ऑक्टोबर 2018 :

नवी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी आज एकत्रितपणे वाशी येथील रघुलीला मॉलमध्ये प्लास्टिक बंदीची  विशेष कारवाई करत 2.5 टन प्लास्टिक जप्त केले. या कारवाईमध्ये  मॉलमधील व्यावसायिकांकडून वापरल्या जाणाऱ्या प्ला‍स्टिकच्या वस्तू जप्त करण्यात आल्या व 11 व्यावसायिकांकडून प्रत्येकी 5 हजार प्रमाणे एकूण 55 हजार इतकी दंडांत्मक रक्कम वसूल करण्यात आली. त्याचप्रमाणे इन ऑर्बिट मॉल मध्ये 12 व्यावसायिकांकडून 60 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.

महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जनजागृतीसोबतच प्लास्टिक वापर करणा-यांविरोधात जप्ती व दंडवसूली स्वरूपात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. वाशी विभागात वाशीचे विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी क्षेत्रीय अधिकारी इंद्रजित देशमुख व राजेंद्र पाटील तसेच महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक सुधीर पोटफोडे व कविता खरात, उप स्वच्छता निरीक्षक सुषमा देवधर व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अशाचप्रकारे नेरुळ विभाग अधिकारी संजय तायडे यांच्या नियंत्रणाखाली सेक्टर-6 येथील दुकाने व हॉटेल व्यवसायिकांवर प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेमध्ये  मॉलमधील सर्व व्यावसायिकांकडून वापरल्या जाणाऱ्या प्ला‍स्टिकच्या वस्तू जप्त करुन 11 व्यावसायिकांवर प्रत्येकी  5 हजार प्रमाणे दंडात्मक कारवाई करून  55 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. 

कोपरखैरणे विभागात सहा. आयुक्त अशोक मढवी व बेलापूर कार्यक्षेत्रात विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आलेल्या प्लास्टिक प्रतिबंध व सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्या दुकाने व हॉटेल व्यावसायिकांवर विशेष दंडात्मक मोहिमेत कोपरखैरणे विभागामार्फत 13 हजार तर बेलापूर विभागामार्फत 10 हजार 500 अशी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.