पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांची मागणी
मुंबई, 27 डिसेंबर 2016/AV News Bureau :
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मित्रपक्षांनी रिपब्लिकन पक्षाला सन्मानपूर्वक जागा सोडाव्यात. त्याचप्रमाणं राज्यात प्रत्येक पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये एक जागा रिपाइंला राखीव सोडावी तसेच राज्यात रिपब्लिकन पक्षाला सत्तेत 5 टक्के वाटा मिळावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले यांनी केली .
आगामी 10 महापालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकांमध्ये भाजप शिवसेनेशी महायुती करणार तसंच जेथे शिवसेना भाजप युती होणार नाही तेथे भाजप सोबत युती करण्यात येईल. मात्र निवडणूक केवळ मित्रपक्षांवर अवलंबून न राहता रिपब्लिकन पक्षाच्या चिन्हावर जिंकण्याची तयारी करावी. रिपाइंच्या धोरणाविरुद्ध स्थानिक पातळीवर युती केली तर पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येईल, असा इशाराही आठवले यांनी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत दिला.
मित्रपक्षांची ताकद वाढत आहे तशीच रिपाइंची ताकद वाढवा. तसंच यापुढील सर्व निवडणूका पक्षाच्या चिन्हावरच लढवा. त्यासाठी रिपाइंच्या चिन्हावरच निवडणूक लढविण्याचा ठराव करण्यात आल्याचंही आठवले यांनी सांगितलं.
या बैठकीस रिपाइंचे राज्य अध्यक्ष भुपेश थुलकर, सरचिटणीस राजा सरवदे, कार्याध्यक्ष बाबुराव कदम, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, एम डी शेवाळे ,पप्पू कागदे, माजी आमदार अनिल गोंडाणे, तानसेन ननावरे , गौतम सोनावणे, अनिल गांगुर्डे, पोपटशेठ घनवट आदी मान्यवर मान्यवर उपस्थित होते.