वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्ग पोलीसांचे आवाहन
अविरत वाटचाल न्यूज
मुंबई, 11 सप्टेंबर 2018 :
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनधारकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन राज्य महामार्ग पोलीसांनी केले आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कोंडी टाळण्यासाठी मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरून कोल्हापूर मार्गे रत्नागिरी व सिंधुदुर्गकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यात जाणाऱ्या गणेशभक्तांनी पनवेल शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कळंबोली-पनवेल बायपास ते पळस्पे फाटा आणि मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरून खोपोली-पाली – वाकण मार्गाचा वापर करावा.
तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्गात जाणाऱ्या वाहनचालकांनी चिपळूणला जाणाऱ्यांनी मुंबई पुणे एक्स्प्रेस वे मार्गे सातारा-उंब्रज-पाटण- कोयना नगर- कुंभार्ली घाट मार्गे खेर्डी-चिपळून रस्त्याचा वापर करावा. हातखंबा येथे जाणाऱ्यांनी मुंबई पुणे एक्स्प्रेस वे मार्गे सातारा-कराड-वाठार-टोप- मलकापूर-शाहूवाडी- आंबाघाट मार्गे लांजा – राजापूर मार्गावरून जावे.
कणकवलीला जाणाऱ्यांनी मुंबई पुणे एक्स्प्रेस वे मार्गे सातारा-कराड-कोल्हापूर शहरातून रंकाळा तलावावरून कळे-गगनबावडा घाट मार्गे वैभववाडी – कणकवली गाठावे.
मुंबईहून सावंतवाडीला जाणाऱ्या कोकणवासीयांनी मुंबई पुणे एक्स्प्रेस वे मार्गे सातारा- कराड-कोल्हापूर-निपाणी- आजरा-आंबोली घाट मार्गे सावंतवाडीला जावे.
गणेशोत्सव काळात कोकणातील वाहतूक सुरळीत सुरू रहावी, यासाठी महामार्ग पोलीसांनी उपाय योजना केल्या असून, ठिकठिकाणी वाहतूक पोलीसांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतुकीसंदर्भात तसेच इतर माहितीसाठी महामार्ग पोलीसांची www.highwaypolice.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अथवा हेल्पलाईन क्रमांक 9833498334 व 9867598675 येथे संपर्क साधावा. तसेच 9503211100 व 9503511100 या क्रमांकावर संदेश पाठविता येईल, असे महामार्ग पोलीसांनी कळविले आहे.
=============================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
- तालवाद्यांची परंपरा जपणारा करूणाकर रामदास पाटील