मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तरूणांना सल्ला
अविरत वाटचा न्यूज
नागपूर,7 सप्टेंबर 2018
राज्यातील खेळाडू व खेळांच्या विविध प्रकाराला प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाच्या वर्ग-1 व वर्ग-2 या पदावर 32 खेळाडूंना शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे खेळाकडे एक करिअर म्हणून पाहण्यास सुरुवात करा. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळवून राज्याचा व देशाचा लौकिक वाढवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये केले. सिव्हिल लाईन्स येथील राणीकोठी येथे नागपूर महानगरपालिका व नागपूर महानगर बॉक्सिंग असोसिएशन, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने सब ज्युनियर गर्ल्स नॅशनल बॉक्सिंग चॅम्पीयनशिपचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन ते बोलत होते.
देशातील खेळाडू विविध क्रीडा प्रकारांमध्ये घवघवीत यश मिळवित आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये देशातील खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले आहे. खेळ हे मोठे करिअर असून याला प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात येत आहे. राज्यातही विविध क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येत आहे. विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय क्रीडास्पर्धांमध्ये अव्वल यश संपादन केलेल्या खेळाडूंना थेट भरतीद्वारे शासन सेवेत समाविष्ठ करुन घेण्यात येत आहे.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर कोहळे, लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, उपमहापौर दीपराज पार्डीकर, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, महानगरपालिका आयुक्त रवींद्र ठाकरे, दयाशंकर तिवारी, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड तसेच बॉक्सिंग असोसिएशन व फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय सब ज्युनियर बॉक्सिंग चॅम्पीयनशिप स्पर्धेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलीत केल्यानंतर स्पर्धेतील अंतिम लढतीच्या कुमारी संजना (दिल्ली) व कुमारी देविका (महाराष्ट्र) यांच्या लढतीला सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्राची कुमारी देविका ही विजेती ठरली.
बॉक्सिंग या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी येथील विभागीय क्रीडा संकुल परिसरात बॉक्सिंग ॲकॅडमी सुरु करण्यात येवून खेळाडूंना बॉक्सिंगसोबतच इतर खेळांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महाराष्ट्रातून एशियाड व ऑलिम्पिकच्या सन 2020 व 2024 या स्पर्धांसाठी देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची निवड प्रक्रिया सुरु करण्यात आली असून यासाठी खेळाडूंना आवश्यक सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याचप्रमाणे आगामी स्पर्धांमध्येही राज्यातून सर्वाधिक पदक विजेते खेळाडू राहतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
बॉक्सिंग स्पर्धेमध्ये 31 राज्यातील 399 खेळाडू सहभागी झाले असून केरळमधूनही 14 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत.