शिक्षकांनीही नवीन तंत्रज्ञानासोबत अद्ययावत व्हावे

महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन.

 

 

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 5 सप्टेंबर 2018:

नवी मुंबई महानगरपालिका गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देत आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या सुविधा पुरवितानाच डिजीटल क्लासरुमसारख्या आजच्या काळाला सुसंगत संकल्पना राबवल्या जात आहेत. आता शिक्षकांनीही स्वत:ला या बदलांशी जोडून घेत समर्थ विद्यार्थी घडविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानासोबत अद्ययावत व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आज वाशी येथे केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृहात शिक्षक दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.

नागरिकांची गरज ओळखून सी.बी.एस.ई. माध्यमाची शाळा सुरु करणारी नवी मुंबई ही पहिलीच महानगरपालिका असल्याचे सांगितले. रात्र महाविद्यालयाची नियोजित संकल्पनाही त्यांनी यावेळी सांगितली.

याप्रसंगी व्यासपिठावर बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदा म्हात्रे, ऐरोली विधानसभा सदस्य आमदार संदीप नाईक, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माजी सचिव बसंती रॉय, सभागृह नेते रविंद्र इथापे, फ प्रभाग समिती अध्यक्ष अनिता मानवतकर, आरोग्य समिती सभापती उषा भोईर, पाणीपुरवठा समिती सभापती अंजली वाळुंज, महिला व बालकल्याण समिती सभापती शिल्पा कांबळी, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, सुनिल पाटील, रमेश डोळे, संगीता बो-हाडे, अतिरिक्त आयुक्त रविंद्र पाटील व रमेश चव्हाण, शिक्षणाधिकारी संदीप संगवे, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक हिराजी गणू पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

शिक्षक हा देशाचा राष्ट्रपती होतो हा शिक्षकांचा गौरव असून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आदर्श नजरेसमोर ठेवून आपण अधिक जोमाने ज्ञानदानाचे पवित्र कार्य करायला हवे असे सांगत नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची वाढती गुणवत्ता आणि त्यामुळे पालकांचा विश्वास वाढून पटसंख्येत होणारी वाढ बघितली की आनंद वाटतो अशा शब्दात महानगरपालिका शिक्षकांच्या कार्यकुशलतेचा सन्मान केला. प्रत्येक माणसाच्या जीवनात त्याला घडविणा-या शिक्षकाचे स्थान सर्वोत्तम असते असे सांगत महापौरांनी आपण शिक्षकाचा मुलगा आहोत याचा अभिमान व्यक्त करीत आपल्या शालेय जीवनातील शिष्यवृत्ती मिळाल्याच्या व भोईरगुरूजी आणि गुरूजनांच्या आठवणींना उजाळा दिला.  

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या माजी सचिव श्रीम. बसंती रॉय यांनी इतर महानगरपालिकांच्या शाळा बंद पडत असताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील पटसंख्या वाढते आहे हेच उत्तम शिक्षण पध्दती राबविली जात असल्याबद्दल कौतुक केले. आज अनेक कौशल्ये व्यक्तीत असावी लागतात याचे भान ठेवून शिक्षकांनाही स्वत:मध्ये बदल घडवावे लागतात असे मत व्यक्त केले.

शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांनी प्रास्ताविकपर मनोगतात नवी मुंबई महानगरपालिका शैक्षणिक विकासासाठी करीत असलेल्या कामांची माहिती देत शिक्षण आणि संस्कार ही जबाबदारी पार पाडणा-या सर्व शिक्षकांचा प्रातिनिधीक स्वरुपात गौरव करण्यासाठी आजचा शिक्षकदिन सोहळा आयोजित करण्यात आल्याचे सांगितले.

  • याप्रसंगी शिष्यवृत्ती परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांना घडविणारे शिक्षक अरूणा वडणेरे, उषा झोके, संजय आमले, पौर्णिमा भडेकर, संगीता दुबे तसेच
  • दहावी एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय निकाल लागलेल्या शाळांचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वरी महाजन (दिघा – 100 टक्के), विजया ठाकुर (दिवाळे – 100 टक्के), शोभा कुदळे (नेरुळ – 95.45 टक्के) 
  • महापालिका शाळांतून एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांना घडविणा-या शाळांचे मुख्याध्यापक अशोक सोनावणे (नेरुळ), माधुरी नारखेडे (करावे), अजय कुपेकर (सेक्टर 7 कोपरखैरणे) या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.

================================================================================================================