माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे यांचा विद्यार्थ्यांना सल्ला
अविरत वाटचाल न्यूज
पालघर, 1 सप्टेंबर 2018 :
इंटरनेटच्या सुविधेमुळे माहिती मिळणे सोपे झाले आहे. तथापि विश्वासार्ह आणि अधिकृत माहिती मिळणेही गरजेचे आहे. लोकराज्य अधिकृत, अचूक, वस्तूनिष्ठ आणि दर्जेदार माहिती देणारे शासनाचे मुखपत्र असून विद्यार्थ्यांनी ते नियमित आणि अवश्य वाचावे, असे आवाहन कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने राज्यात लोकराज्य वाचक अभियान राबविण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यात सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात या अभियानाला सुरूवात करण्यात आली. प्राचार्य डॉ.किरण सावे, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक विवेक कुडू यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
सध्या राज्यातील पहिल्या तर देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या खपाचे लोकराज्य लवकरच देशातील पहिल्या क्रमांकाचे मासिक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शासनाच्या योजनांची सविस्तर माहिती आणि केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचविणारे लोकराज्य संग्राह्य आणि उपयुक्त असल्याने विद्यार्थ्यांनी ते नियमित वाचावे, असे आवाहन त्यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या युवा माहिती दूत उपक्रमाची माहितीही डॉ.मुळे यांनी विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन शासनाच्या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात मोलाचा वाटा उचलावा, असे आवाहनही त्यांनी केले.
लोकराज्यच्या माध्यमातून त्या योजना सर्वांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत. त्याचबरोबर युवा माहिती दूत या उपक्रमामध्ये सरकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवितानाच त्यांचा स्वत:च्या आयुष्यातही लाभ होणार आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे काम करताना हे कार्य देखील स्वत:चे व्यक्तीमत्व घडविण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास प्राचार्य डॉ.सावे यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी विद्यार्थ्यांना युवा माहिती दूत उपक्रमाबाबत माहिती देणारी ध्वनीचित्रफीत दाखविण्यात आली. तसेच घडीपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्रा.कुडू यांनी महाविद्यालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांबाबत माहिती दिली तर प्र.जिल्हा माहिती अधिकारी ब्रिजकिशोर झंवर यांनी लोकराज्यचे वार्षिक वर्गणीदार होण्याचे तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा माहिती कार्यालय पालघर येथे संपर्क साधण्याचे आवाहन केले.
============================================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
- नेरूळ- खारकोपर रेल्वेमार्ग ऑक्टोबरमध्ये- सिडको एमडी