- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
-
सिडकोच्या 14 हजार 838 घरांच्या सोडतीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज शुभारंभ
अविरत वाटचाल न्यूज
मुंबई, 13 ऑगस्ट 2018:
सिडकोतर्फे या वर्षाअखेरीस आणखी 25 हजार घरांची सोडत जाहीर करण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सिडकोने एक लाख घरे बांधण्यांचे उद्दिष्ट ठेवावे, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिडकोला केली.
- सिडकोतर्फे ‘सर्वांसाठी घरे’ धोरणाअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ‘महागृहनिर्माण योजनेत’ साकारण्यात येणाऱ्या 14 हजार 838 परवडणाऱ्या घरांच्या ऑनलाईन सोडतीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी त्यांनी आणखी 25 हजार घरांच्या सोडतीची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले. त्यांनी या योजनेचा सविस्तर तपशिल व नोंदणी प्रक्रीया विषद केली.
- राज्यात मुंबई व मुंबई महानगर परिसरात सर्वात जास्त घरांची मागणी आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. म्हाडाला पीपीपी योजनेतून 1 लाख घरे मिळणार आहेत. तसेच घरांसाठी संयुक्त भागीदारी मंजूर केली आहे. घरांच्या या योजनेत सिडकोसुद्धा सहभागी झाली असून नवी मुंबई परिसरात त्यांनी आता ही 14 हजार घरांची योजना सुरू केली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
- सदर योजनेतील एकूण 14 हजार 838 घरांपैकी 5 हजार 262 सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी आहेत. तर 9 हजार 576 सदनिका अल्प उत्पन्न घटकातील नागरिकांसाठी आहेत. नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली, द्रोणागिरी या 5 नोड्समध्ये 11 ठिकाणी ही गृहनिर्माण योजना साकार होत आहेत.
सिडकोच्या घरांसाठी आर्थिक उत्पन्नाची अट
ज्या नागरिकांचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न रू. 25 हजार पर्यंत आहे ते आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उपलब्ध सदनिकांसाठी अर्ज करू शकतात. तर ज्या नागरिकांचे सरासरी मासिक उत्पन्न रू. 25 हजार 001 ते 50 हजार रुपये आहे ते अल्प उत्पन्न घटकांसाठी उपलब्ध सदनिकांसाठी अर्ज करू शकतात. आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातील सदनिकांसाठी अर्ज करताना सोबत अनामत रक्कम 5000 रुपये व अर्ज शुल्क 280 रुपये अशी एकूण 5 हजार 280 रुपये रक्कम भरायची आहे. तर अल्प उत्पन्न गटातील सदनिकांसाठी अर्ज करताना सोबत अनामत रक्कम 25 रुपये हजार व अर्ज शुल्क 280 रुपये अशी एकूण 25 हजार 280 रुपये रक्कम भरायची आहे.
- सिडकोच्या या महागृहनिर्माण योजनेत तळोजा येथील सेक्टर 27 मध्ये आसावरी गृहसंकुल, सेक्टर 21 मध्ये केदार गृहसंकुल, सेक्टर 22 मध्ये मारवा गृहसंकुल, सेक्टर 29 मध्ये धनश्री गृहसंकुल, खारघर येथील सेक्टर 40 मध्ये बागेश्री गृहसंकुल, कळंबोली येथील सेक्टर 15 मध्ये हंसध्वनी गृहसंकुल, घणसोली येथील सेक्टर 10 मधील भूखंड क्र. 1 वर मालकंस गृहसंकुल, भूखंड क्र. 2 वर मेघमल्हार गृहसंकुल, द्रोणागिरी येथील सेक्टर 11 मध्ये मल्हार गृहसंकुल, सेक्टर 12 मधील भूखंड क्र. 63 वर भूपाळी गृहसंकुल व भूखंड क्र. 68 वर भैरवी ही गृहसंकुले साकारण्यात येत आहेत.
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उपलब्ध सदनिकांचे चटई क्षेत्रफळ 25.81 चौ.मी. आहे तर अल्प उत्पन्न गटांसाठी उपलब्ध सदनिकांचे चटई क्षेत्रफळ 29.82 चौ.मी. आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तळोजा येथे 2 हजार 862 सदनिका, खारघर येथे 684 सदनिका, कळंबोली येथे 324 सदनिका, घणसोली येथे 528 सदनिका व द्रोणागिरी येथे 864 सदनिका उपलब्ध आहेत. अल्प उत्पन्न घटकांसाठी तळोजा येथे 5 हजार 232, खारघर येथे 1 हजार 260, कळंबोली येथे 582, घणसोली येथे 954 व द्रोणागिरी येथे 1 हजार 548 सदनिका उपलब्ध आहेत.
सिडकोच्या इतिहासात प्रथमच गृहनिर्माण योजनांच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. या योजनेत अर्ज नोंदणी, शुल्क भरणा ऑनलाईल पद्धतीने करायचे असल्याने संपूर्ण सोडतीची प्रक्रीया पारदर्शक व सुलभ असणार आहे. सदर प्रक्रीया अत्यंत सोपी, सुस्पष्ट व सहज समजेल अशी आहे. सर्वसामान्यांना ही प्रक्रीया व्यवस्थित समजून योजनेत भाग घेता यावा यासाठी सिडकोचे संकेतस्थळ https://lottery.cidcoindia.com वर योजनेच्या प्रक्रीयेची माहिती शाब्दिक व चलचित्र स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही योजना संकेतस्थळावर 13 ऑगस्ट 2018 पासून सुरू झाली आहे. प्रत्यक्षात अर्ज नोंदणीची कार्यवाही 15 ऑगस्ट 2018 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून सुरू होणार आहे. नोंदणीकृत अर्जदार या योजनेत दिनांक 16 सप्टेंबर 2018 रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज दाखल करू शकतात. तर अनामत रक्कम व अर्जाचे शुल्क ऑनलाईन भरण्याची मुदत दिनांक 15 ऑगस्ट 2018 ते दि. 17 सप्टेंबर 2018 पर्यंत आहे.
- ज्या इच्छुक अर्जदारांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अर्ज करायचा आहे त्यांनी प्रधान मंत्री आवास योजना पोर्टल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था पोर्टलवर, जसे नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका किंवा म्हाडा यांच्यापैकी कोणत्याही एका वेब पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्या अर्जदारांनी यापूर्वीच नोंदणी केली आहे त्यांनी पुनःश्च नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अर्ज केलेल्या अत्यल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना घर प्राप्त झाल्यास एकूण 2.5 लाख रूपयांचे अनुदान मिळणार आहे तर सी.एल.एस.एस. च्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील घर प्राप्त होणाऱ्या लाभार्थ्यांना 2.67 रुपये लाख व्याज अनुदान प्राप्त होणार आहे. या महागृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत दिनांक 2 ऑक्टोबर 2018 रोजी होणार आहे. त्याचप्रमाणे सिडकोतर्फे आणखीन 25 हजार घरांच्या गृहनिर्माण योजनेसंदर्भातील निविदा प्रक्रीया सुरू आहे. सदर निविदा प्रक्रीया पूर्ण करून या वर्षाअखेरीपर्यंत ही गृहनिर्माण योजना सिडकोतर्फे जाहीर करणे प्रस्तावित आहे. या गृहनिर्माण योजनेतदेखील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प अत्पन्न घटकांसाठी सदनिका उपलब्ध असतील.
=========================================================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
- न्हावा शेवा- शिवडी ट्रान्सहार्बर लिंक रोड