महापालिका रुग्णालयांत आता 24 तास डॉक्टर्स

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 18 जुलै 2018:

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करण्याकडे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी विशेष लक्ष दिले आहे. महानगरपालिकेच्या वाशी, नेरुळ, ऐरोली येथील सार्वजनिक रुग्णालय तसेच बेलापूर येथील माता बाल रुग्णालयात कॉलेज ऑफ फिजीशियन ऑफ सर्जन ऑफ मुंबईतर्फे सुमारे 44 डॉक्टर्स उपलब्ध होणार असून महापालिका रुग्णालयांमध्ये 24 तास निष्णात डॉकर्सची सेवा नवी मुंबईकरांना मिळेल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये नवी मुंबईतीलच नव्हे तर  पनवेल, उऱण, मानखुर्द अशा बाहेरील भागातही रुग्ण मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी येत असतात. मात्र या रुग्णालयांमध्ये डॉक्टर्सची कमतरता असल्यामुळे नागरिकांना योग्य त्या आरोग्य सेवा देताना अडचणी भासत होत्या. त्यामुळे डॉ. रामास्वामी एन. यांनी महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध देण्याविषयी धोरण निर्माण केले. त्यानुसार वाशी येथील सार्वजनिक रुग्णालय, नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय, ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालय तसेच बेलापूर येथील माता बाल रुग्णालय अशा महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये कॉलेज ऑफ फिजीशियन ऑफ सर्जन ऑफ मुंबई यांचेमार्फत MOHFW, GOI मान्यताप्राप्त पदविका अभ्यासक्रम (Diploma Courses) सुरु केला आहे. तसेच महापालिकेच्या या रुग्णालयांना कॉलेज ऑफ फिजीशियन ऑफ सर्जन ऑफ मुंबई येथे नोंदणीकृत केले आहे.

  1. वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयाकरीता 30 डॉक्टर्स
  2. नेरुळ येथील सार्वजनिक रुग्णालय व बेलापूर येथील माता बाल रुग्णालय याकरीता 8 डॉक्टर्स
  3. ऐरोली येथील सार्वजनिक रुग्णालयाकरीता 6 डॉक्टर्स

महापालिका रुग्णालयांमध्ये हे डॉक्टर्स 24 तास उपलब्ध होणार आहेत. हे डॉक्टर्स NEET परिक्षेव्दारे निवड झालेली असून त्यांची नियुक्ती कॉलेज ऑफ फिजीशियन ऑफ सर्जन ऑफ मुंबई यांचेमार्फत केली जाणार आहे.

=======================================================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • घोट नदीत कार कोसळल्यानंतरचा थरार