अविरत वाटचाल न्यूज
कल्याण, 13 जुलै 2018:
वसई-विरार परिसरातील काही सखल भागात गुरुवारी रात्री उशिरा पर्यंत पाणी न ओसरल्याने वीज पुरवठा बाधित होता. त्यामुळे वीज ग्राहकांना दिलासा मिळावा यासाठी जनरेटरद्वारे वीज पुरवठा करण्यात आला. या वीज पुरवठ्यामुळे सुमारे 1200 ग्राहकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली तसेच इमारतींनाही वीज पुरवठा केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
पावसाचे पाणी ओसरल्यानंतर 11जुलै रोजी रात्री 8.30 च्या सुमारास महावितरणची सर्व यंत्रणा व बहुतांश ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत झाला. पण गुरुवार पर्यंत वसई मधील अश्विन नगर, दिवाणमान, दीनदयाल नगर, साईमंदिर परिसर, नवयुग नगर या परिसरातील महावितरणचे आठ ट्रान्सफॉरमर पावसाच्या पाण्याच्या संपर्कात होते. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव येथील वीज पुरवठा गुरुवारी रात्री पर्यंत सुरु करणे शक्य झाले नव्हते. यामुळे 17 सोसायट्यांमधील सुमारे 1200 ग्राहकांना अडचणी भेडसावत होत्या. त्यामुळे वरील सर्व परिसरात तीन जनरेटरद्वारे प्रत्येक सोसायटीस सुमारे दोन ते तीन तास वीज पुरवठा देण्यात आला. यामुळे ग्राहकांना पिण्याचे पाणी सोसायटीच्या छतावर असलेल्या टाक्यामध्ये चढवता आले. तसेच इमारतींनाही वीज पुरवठा केल्याने इतरही समस्या सोडवल्या गेल्या. जनरेटरचा वीज पुरवठा सोसायटीच्या मीटर केबिनला देऊन ही मोहीम राबवण्यात आल्याची माहिती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले यांनी दिली.
- महावितरणचे संचालक(प्रकल्प) दिनेशचंद्र साबू, कोकण प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक श्रीकांत जलतारे व कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता रफिक शेख या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून यंत्रणा राबवत होते. नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी ग्राहकांशी असलेली बांधिलकी जपण्याचा महावितरणचा हा उपक्रम गुरुवारी रात्री उशिरा म्हणजेच पावसाचे पाणी ओसरून, वीज यंत्रणा सुरु होऊपर्यंत चालू होता. महावितरणच्या या सेवेबाबत बऱ्याच ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.
- वसई-विरार महानगरपालिकेचे माजी महापौर नारायण मानकर, उपमहापौर प्रकाश रॉड्रीक्स यांनीही महावितरणच्या या उपक्रमाचे कौतुक केले. ही मोहीम यशस्वीपणे राबवण्यासाठी सिंहाजीराव गायकवाड, सिद्धराज किन्नुर, सुर्यकांत महाजन, प्रेमानंद रांजणे, प्रसाद शिसोदे, अभिलाष म्हसकर, अरुण पुजारी, दीपक डोंगरे यांनी व त्यांच्या संपूर्ण जनमित्रांच्या टीमने विशेष प्रयत्न केले.
- महावितरणच्या प्रयत्नांचे नागरिकांकडून कौतूक
==========================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
- न्हावा शेवा -शिवडी ट्रान्सहार्बर लिंक रोड