संग्रहित फोटो
अविरत वाटचाल न्यूज
मुंबई, 29 मे 2018:
येत्या पावसाळ्यात मुंबई शहरात पाणी साचू शकेल अशी 225 ठिकाणं आढळून आली आहेत. यामध्ये पूर्व उपनगरातील 74, पश्चिम उपनगरातील 88 तर मुंबई शहरातील 63 ठिकाणे आहेत. त्यातील 120 ठिकाणांवर उपाययोजना करण्यात आली आल्याची माहिती महापालिकेने राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व मॉन्सूनपूर्व तयारी बाबत आढावा बैठकीत दिली आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे आज राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व मॉन्सूनपुर्व तयारी बाबत आढावा बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मदत व पुर्नवसन मंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन आदी यावेळी उपस्थित होते.
मुंबई महापलिका, हवामान विभाग, भारतीय सेना, भारतीय वायू सेना, भारतीय नौसेना त्याचबरोबर राज्यातील विभागीय आयुक्त यांनी आपत्ती निवारणासाठी घेतलेल्या उपाययोजनांबाबत सादरीकरण केले.
मुंबई शहरात पावसाचे पाणी उपसा करणारे 298 पंप यावर्षी बसविण्यात आले असून शहरात 102, पुर्व उपनगरात 96 आणि पश्चिम उपनगरात 100 अशी त्यांची संख्या आहे. तासाला 1 हजार घनमीटर पाणी उपसा करणारी उच्च दाबाचे पंप प्रथमच बसविण्यात आले आहेत अशी माहिती यावेळी महापालिकेने दिली.
मुंबईत गेल्या वर्षी पाणी साचण्याच्या मोठ्या प्रमाणावर घटना घडल्या. या घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाल्याने यावर्षी अशा ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. नालेसफाई, रस्त्यांवरील खड्डे यासाठी मुंबई महापालिकेने विशेष नियोजन केल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मेट्रोच्या कामांमुळे पाणी साचू नये यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने यासाठी विशेष दक्षता घेऊन उपाययोजना केली आहे. असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हवामान विभागाचे उपसंचालक के.एस.घोसाळीकर यांनी सादरीकरणा दरम्यान सांगितले, मॉन्सूनचे केरळमध्ये आगमन झाले असून महाराष्ट्रात 96 ते 104 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात जुनमध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला.
पावसाळ्यासाठी मुंबई महापालिकेने केलेल्या उपाययोजना :
- तासाला 1 हजार घनमीटर पाणी उपसा करणारी उच्च दाबाचे पंप प्रथमच बसविण्यात आले आहेत.
- मुंबईत 250 किलोमिटर लांबीचे नाले असून 95 टक्के नाले सफाईचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम 31 मे पूर्वी केले जाईल.
- मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गालगतच्या भूमीगत गटारांमध्ये यावर्षी कॅमेरे बसविण्यात आले असून त्याच्या सहाय्याने पाण्याचा होण्याऱ्या निचऱ्याची सचित्र माहिती मिळणार आहे.
- दहिसर, मिठी, पोईसर, ओशिवरा नदी, मोगरा नाला अशा सात ठिकाणी ट्रॅश बूम लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे पंपीग स्टेशनमध्ये प्लॅस्टिकचा कचरा जमा होणार नाही.
- मुंबईत सात ठिकाणी रडारलेव्हल ट्रांन्समिटर बसविण्यात आले असून यामुळे मुंबईतील नदी आणि तलावांच्या पाण्याच्या पातळीबाबत माहिती उपलब्ध होणार आहे.
- मुंबईतील 1200 मॅनहोल्सवर सुरक्षा जाळ्या बसविण्यात आल्या आहेत.
- मुंबई महापालिकेचे 1941 कि.मी लांबीचे रस्ते असून 31 मे पुर्वी या रस्त्यावरील डागडूजीचे काम पुर्ण करण्यात येणार आहे. 600 किलोमिटर लांबीच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे.
- मुंबईत सी-1 वर्गाच्या 688 धोकादायक ईमारती असून त्या खाली करण्यासाठी नोटीस देण्यात आल्या आहेत.
- पावसाळा व त्यासंबधी आजार आणि त्यामुळे उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेता वैद्यकीय महाविद्यालये आणि परिसरातील रुग्णालयातील 1300 खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
- मुंबईतील गिरगांव चौपाटी, शिवाजी पार्क, जुहु, वर्सोवा, अक्सा आणि गोराई या सहा बीचवर सुरक्षेसाठी 36 जिवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.