- बेलापूर ते वाशी दरम्यानचे सर्व हायमास्ट कात टाकणार
अविरत वाटचाल न्यूज
नवी मुंबई, 9 मे 2018:
वाशी ते बेलापूरदरम्यान लावण्यात आलेले सर्व हायमास्ट आता कात टाकणार आहेत. 15 वर्षे जुन्या हायमास्टमध्ये लावण्यात आलेले पारंपरिक दिवे बदलून त्यांच्याजागी एलइडी दिवे लावण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे तारा आणि खांब यांचीही दुरूस्ती करण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. या सर्व बदलानंतर बेलापूर ते वाशी दरम्यानचा परिसर एलईडी हायमास्टच्या प्रकाशाने उजळून निघणार आहेच शिवाय वर्षाला तब्बल 37 लाखांपेक्षाही अधिक रकमेची बचतही होणार आहे. या कामासाठी 1 कोटी 68 लाख 86 हजार 860 रूपये किमतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून मे महिन्याच्या महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.
- नवी मुंबई महापालिका प्रशासन शहर अधिकाधिक प्रकाशमान व्हावे यासाठी अनेक उपाययोजना करीत आहे. नवी मुंबई शहरात परिमंडळ 1 मधील प्रमुख रस्त्यांवर लख्ख उजेड राहावा यासाठी महापालिकेने 15 वर्षांपूर्वी हायमास्ट बसविले होते. नवी मुंबई शहर खाडिकिनारी असल्यामुळे हवामान दमट आहे. या दमट हवामानामुळे हायमास्टचे खांब आणि तारा खराब झाल्या आहेत. त्यामुळे अनेकदा दुरूस्तीच्या कामात अडथळा निर्माण होतो. यापार्श्वभूमीवर वाशी ते बेलापूरदरम्यान असलेल्या सर्व हायमास्टची दुरूस्ती करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनीही या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
प्रस्तावित काम
- वाशी ते बेलापूरदरम्यानच्या एकूण 25 हायमास्ट खांब बदलणे
- सोडिअम दिव्यांऐवजी 400 वॅटचे 60 एलईडी दिवे लावणे
- रोप व वींच (तारा) बदलणे
कामाचा अंदाजित खर्च
- 1 कोटी 68 लाख 86 हजार 860 रूपये
नुतनीकरणाचे फायदे
- एलईडी दिव्यांचा अधिक प्रकाश
- हायमास्टचे नुतनीकरण झाल्यानंतर एका वर्षात 57 हजार 24 वीज युनिटची (kwh) बचत होणार आहे.
- 37 लाख 6 हजार 560 रुपयांची वार्षिक बचत