अविरत वाटचाल न्यूज
पनवेल, 23 एप्रिल 2018:
महाराष्ट्रात खाद्यपदार्थांची एक वेगळी संस्कृती आहे आणि ही खाद्यसंस्कृती पनवेलकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी खास मिसळ महोत्सवाचे आयोजन केले आहे. 28 एप्रिल ते 1 मे पर्यंत पनवेलमधील पटवर्धन हॉस्पिटलसमोर गुजराथी शाळेच्या पटांगणात दुपारी 4 ते रात्री 11 वाजेपर्यंत मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
चार दिवस चालणाऱ्या या मिसळ महोत्सवात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मिसळीच्या विविध बारा प्रकारच्या लज्जतदार चव खवय्यांना घेता येणार आहे. यामध्ये काळी मिसळ, लाल मिसळ, तांबडी मिसळ,चुलीवरच्या मिसळ तसेच विशेष म्हणजे जैन मिसळचाही समावेश असणार आहे. झणझणीत मिसळ सोबत थंडगार पन्हं, ताक, पियुष, मलई गोळा, विविध ज्यूस, सरबते, विविध आईस्क्रीम यांची मेजवानी असणार आहे .
सातारा, सांगली, पुणे, नाशिक, रांजनगाव, कोल्हापूर, मामलेदार ठाणे, मुंबई, कोकण अशा विविध प्रदेशातून आलेले चवदार मिसळीचे स्टॉल तसेच आपल्या पनवेल मधील मानाच्या फेमस स्थानिक मिसळीचा या ठिकाणी सहभाग असणार आहे. या मिसळ महोत्सवाला जास्तीत जास्त नागरिकांनी खवय्यांनी येऊन चवदार मिसळीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.
अविरत वाटचाल न्यूज
हॅंडलूम उत्पादनांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न