- स्वप्ना हरळकर/ अविरत वाटचाल
- नवी मुंबई, 9 एप्रिल 2025
कोणतंही मेट्रो शहर असो किंवा छोटं शहर वाहतूककोंडी कायमची झालेली आहे. घराबाहेर पडताना आधी रस्त्यावरच्या वाहनांचा विचार करून निघावं लागतं कारण फूटपाथवर फेरीवाल्याचं राज्य असल्याने चालण्यासाठी रस्त्यावर उतरावंच लागतं. त्यामुळे कितीही मोठा रस्ता बनवा तो अपुराच पडतो. वाढललेली वाहनांची संख्या आता केवळ दिसतच नाहीत तर त्यामुळे समस्याही निर्माण होऊ लागल्या आहेत.
माणसांच्या गरजा जशा वाढत गेल्या तश्या त्याने आपल्या सुखासाठी वेगवेगळे शोध लावले. प्रवास आणि दळणवळणासाठी वाहनांचा शोध लावला गेला. गरज म्हणून लागलेला शोध आता मात्र चैन झाली आहे. शहरात ही चैन असली तरी अजूनही ग्रामीण भागात, खेड्यापाड्यात अत्यावश्यक बाब आहे. मग शहरात, गावात ही समस्या का बनली आहे याचं कारण म्हणजे वाहनचालकांना नसलेली शिस्त आणि स्थानिक प्रशासनाचं होणारं दुर्लक्ष.
वेगाने विस्तारणा-या जगात तंत्रज्ञानाचाही विकास होत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा समावेश असणारी वाहनं रस्त्यावर धावत आहेत. मात्र त्याप्रमाणात वाहनचालकांची मानसिकता मात्र बदलताना दिसून येत नाही. विशेषतः दुचाकी वाहनचालकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर नियम न पाळणाऱ्यांची संख्या जास्त असेल. काही सन्माननीय अपवाद वगळता जवळपास हे चित्र सगळीकडे सारखंच आहे. जलद वाहतूक होते म्हणून दुचाकीचा वापर केला जातो मात्र रस्त्यावर वाहन कुठेही उभं करून ठेवणं,उलट्या दिशेने वाहतूक करणं, दुचाकीवर बसून भाजीपाल्याची खरेदी करण्याचे प्रकार तर नेहमीच दिसून येतात.
वाहतूक सिग्नल तोडल्यामुळे होणारे अपघात तर फार भयंकर असतात. जवळपास अशीच अवस्था चारचाकी वाहनचालकांची आहे. वाहनं रस्त्यात उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय याचं भानही राहिलेलं नाही. बर्याचदा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी असलेल्या बस थांब्यावर खासगी गाड्यांचं पार्किंग केलेलं दिसून येतं. आता तुम्ही चारचाकी वाहनातून फिरता पण सामान्य माणसाला किमान सार्वजनिक बस थांब्यावर तरी थांबणाचं सुख मिळू नये यासाठी मुद्दाम हा खोचकपणा करतात की काय असं वाटतं. याचा अर्थ कोणती जागा राखीव आहे कोणती जागा मोकळी ठेवणं गरजेचं आहे याचं भानही राहिलेलं नाही. मग सामान्य माणूस बसची वाट पहात पुन्हा रस्त्यावर उभा राहिलेला दिसून येतो. मग बस थांबे कोणासाठी उभारले जातात. याकडे स्थानिक वाहतूक विभागाचंही दुर्लक्ष होत असतं.
किमान बस थांबे आणि शाळा, महाविद्यालय परिसरात पिवळे पट्टे मारून नो पार्किंग झोन करणं आवश्यक आहे. नुसतं घोषित करून उपयोग होणार नाही त्याची कडक अंमलबजावणीही व्हायला हवी. वाहतूक दंड हा सोपस्कार न होता यापुढे अशी चूक होणार नाही ही जाणीव निर्माण व्हायला हवी. रस्त्यावर वाहतूक हवालदार उभा असलेला पाहिलं की अनेकांकडून नियम पाळण्याचा देखावा केला जातो आणि पुन्हा तेच होतं. त्यापेक्षा आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक दंडाची शिक्षा केली जावी. मोठ्या महामार्गावर असलेल्या नियमांचा वापर आता छोट्या मार्गावरही करण्याची गरज आहे.
कोणताही भाग जेव्हा नव्याने विकसित होत असतो तेव्हा तिथे भविष्यातील वाढणारी वाहनांची संख्या लक्षात घेऊन वाहनतळ विकसित करण्याची जबाबदारी ही स्थानिक संस्थांवर असते. दुर्दैवाने वाहनतळ विकसित केले जात नाहीत किंवा केले तरी त्यांची संख्या पुरेशी नसते. या वाहनतळापर्यंत पोहोचण्यासाठीही लागणारा वेळ जास्त असतो. नवीन ठिकाणी गेल्यानंतर तर अशी वाहनतळ नकाशावरच नसतात त्यामुळे गोंधळ निर्माण होतो.
चारचाकी वाहन असो किंवा दुचाकी वाहन वाहतूकीचे नियम मात्र सर्वांनाच लागू होतात. हे नियम आपल्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी असतात हे जोपर्यंत वाहनचालन समजून घेत नाहीत तोपर्यंत वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार नाही. समाज साक्षर आहे मात्र सुशिक्षित नाही. वाहनचालकांना किमान वाचता तरी येतं त्यामुळे रस्त्यावर लावलेले फलक, लिहिलेल्या सूचना यांचं तरी पालन व्हावं ही अपेक्षा आहे.
किमान नियम पाळणं आवश्यक आहे असं जोपर्यंत स्वतःच्या मनाला जाणवत नाही तोपर्यंत कितीही कडक नियम करा त्यातून पळवाटा काढल्या जातातच. एखादी मोठी घटना घडल्यानंतर चुक कोणाची झाली हे उगाळत राहण्यापेक्षा नियम पाळणं आवश्यक आहे.
———————————————————————————————