ठाणे जिल्हयासाठी स्थानिक सुट्टया जाहीर

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 6 फेब्रुवारी 2025

 

ठाणे जिल्हा महसूल हद्दीतील शासकीय कार्यालयांसाठी शासनाने सन 2025 करिता जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टयांव्यतिरीक्त तीन सार्वजनिक सुट्टया कोंकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी परिपत्रकाव्दारे जाहीर केल्या आहेत.

ठाणे जिल्हा महसूल हद्दीतील शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांकरिता शासनाने सन 2025 करिता जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टयांव्यतिरिक्त  8 ऑगस्ट 2025 शुक्रवार नारळी पौर्णिमा, 2 सप्टेंबर 2025 मंगळवार जेष्ठागौरी विसर्जन,  20 ऑक्टोंबर 2025 सोमवार नरक चतुर्दशी या तीन स्थानिक सुट्टया जाहीर करण्यात आल्या आहेत. शासन ठराव राजनैतिक व सेवा विभागाकडील 16 जानेवारी 1958 च्या निर्णयातील परिच्छेद क्र. 5 अन्वये विभागीय आयुक्त कोकण विभाग यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार हे करण्यात आले आहे.

या दिवशी ठाणे जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालये बंद राहतील.  असे कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी कळविले आहे.

———————————————————————————————–


———————————————————————————————–