- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 5 फेब्रुवारी 2025
डेटिंग अॅपच्या माध्यमातून महिला बनून आपल्या जाळ्यात ओढळून तब्बल 33 लाखांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या भामट्याला नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने देहरादून येथून अटक केली आहे.
आरोपी संजय कैलासचंद मिना (24) याने इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले आहे. तो मूळचा राजस्थानचा रहीवाशी असून उत्तराखंडमधील देहरादून येथे वास्तव्याला होता. संजयने तक्रारदार व्यक्तीशी Bumble App अॅप व व्हॉट्सअॅप वरून संपर्क करून मैत्री केली. आपण महिला असल्याचे भासवून संजय याने तक्रारदाराशी प्रेमाचे नाटक करून भेटायला येण्याचे अमिष दाखवले. तसेच वेळोवेळी विविध कारणे सांगत 30 मार्च 2023 ते 30 जून 2024 या काळात तब्बल 33 लाख 37 हजार 70 रुपये तक्रारदाराकडून प्राप्त केले होते. फसवणुक केलेल्या रक्कमेने आरोपीने स्वतःसाठी Volkswagen Car खरेदी केली. मात्र कालांतराने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार व्यक्तीने आर्थिक फसवणूकीची तक्रार दाखल केली होती.
या गुन्हयाच्या तपासा दरम्यान फिर्यादी यांची फसवणुक करण्याकरीता आरोपीने वापरलेले मोबाईल क्रमांक व बैंक खाते यांचे तांत्रिक विश्लेषण केले नंतर आरोपीताचे वास्तव देहरादुन, उत्तराखंड येथील असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या आधारे 23 जानेवारी 2025 रोजी नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या पथकाने देहरादून येथे जावून आरोपी संजय याला अटक केली. सध्या त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आल्याची माहिती सायबर सेलच्या पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपीकडून १ Volkswagen Car, ४ मोबाईल फोन, ८ सिमकार्ड, १ एपल मॅकबूक, १ हार्डडिस्क, 1 डोंगल जप्त केले आहे.
क्लिक करा : आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्हयांवर लक्ष
याप्रकरणी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे, उपायुक्त गुन्हे शाखा तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम,पोलीस निरीक्षक विशाल पादीर, उपनिरीक्षक राहुल कोळी, पोलीस कर्मचारी अल्पेश पाटील, एकनाथ बुरूंगले, सचिन पावसे, नितेश म्हात्रे व पुनम गडगे यांनी उघडकीस आणला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम करीत आहेत.
——————————————————————————————
——————————————————————————————-