मुंबई- गोवा महामार्ग अपडेट : पनवेल-इंदापूर दरम्यानची शिल्लक कामे ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची माहिती

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 5 फेब्रुवारी 2025

राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 (जुना क्र. 17) च्या पनवेल ते इंदापूर या टप्प्याचे संपूर्ण काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी दिली आहे. सध्या पनवेल ते इंदापूर दरम्यानच्या टप्प्यात सेवा रस्ता पूर्ण करण्याचे काम प्रगतीपथावर असून मुख्य रस्त्याच्या व्हाईट टॉपिंग अर्थात पीक्यूसीचे पूर्ण झाले असल्याचेही प्राधिकरणाने कळविल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले.

क्लिक करा: सायबर साक्षरतेची गरज

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पनवेल ते इंदापूर दरम्यान राष्ट्रीय महमार्ग क्र 66 च्या चौपदरीकरणाचे काम हाती घेतले आहे. हे काम दोन टप्प्यामध्ये सुरू असून पहिला टप्पा पनवेल ते कासू आणि दुसरा टप्पा कासू ते इंदापूर असा आहे. या परिसरात होणारा मुसळधार पाऊस आणि हवामानाचा विचार करून हा रस्ता मजबूत आणि टिकाऊ होण्यासाठी कठोर काँक्रीट रस्ते (रिजिड पॅव्हमेंट) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रस्त्याच्या खालीलबाजूसही मजबूत आणि टिकाऊ कॉंक्रिटीकरण करण्यात येत आहे.


पनवेल ते इंदापूर या 84 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाची जबाबदारी मे./स. सुप्रीम पनवेल इंदापूर टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे होते. परंतु, कंत्राटदाराने प्रकल्पाच्या अटी पूर्ण न केल्याने 17 नोव्हेंबर 2021 रोजी करार रद्द करण्यात आला. त्यानंतर या रस्त्याचे काम दोन कंपन्यांना देण्यात आले असून पनवेल ते कासू या 42 किलोमीटरच्या रस्त्याचे काम मे.स.जे.एम.म्हात्रे या कंत्राटदाराला जानेवारी 2023 मध्ये 151.26  कोटीं रुपयांच्या करारासह देण्यात आले. एप्रिल 2023 मध्ये अधिकृत कामाला सुरुवात झाली.

क्लिक करा :  प्राणी प्रेम आणि स्वच्छता

कासू ते इंदापूर 42 किलोमीटर रस्त्याचे काम मे.स. कल्याण टोलवे या कंत्राटदाराला ऑक्टोबर 2022 मध्ये 332 कोटी रुपयांच्या करारासह देण्यात आले. नोव्हेंबर २०२२ मध्ये अधिकृत कामाला सुरुवात झाली. 42.3 कि.मी.पैकी 30 कि.मी. मुख्य मार्गाचे काँक्रिट काम पूर्ण झाले आहे, तसेच कंत्राटदाराने रस्ता वाहतुकीसाठी चालू ठेवला आहे.

————————————————————————————————-

 


————————————————————————————————–