- स्वप्ना हरळकर /अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
देशातल्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारांना पत्र लिहून विशेष तयारी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. काही राज्यं/केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्व गुणवत्ता निर्देशांक (ए क्यू) मध्यम ते खराब पातळीवर पोहोचला आहे. आगामी सणासुदीचा हंगाम आणि ओला पाऊस लक्षात घेता हे आणखी बिघडू शकते असं या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.
या पत्रानंतर हवा प्रदूषणाची समस्या किती गंभीर बनली आहे आणि भविष्यातही याचे काय परिणाम सोसावे लागणार आहेत याचा अंदाज येत आहे. काही दिवसांवर आलेला आणि संपूर्ण देशभरात साजरा होणारा दिवाळी हा सण आणि त्याच्या जोडीने येणारं हवा प्रदूषण ही दरवर्षी निर्माण होणारी समस्या आहे. मात्र यंदा ही जास्त गंभीर बनणार आहे असा अंदाज या पत्रामुळे समोर आला आहे.
कोणताही सण, उत्सव, लग्न समारंभ यांमध्ये आवाज करणारे, कानठळ्या बसवणारे फटाके फोडले जातात. अगदी सहजपणे होणारा हा प्रकार आता आपल्याच समस्येसाठी कारणीभूत ठरत आहे. आपला आनंद व्यक्त करताना इतरांना त्रास होतो याची कल्पनाही केली जात नाही. विशेषतः याचा त्रास लहान मुलं आणि वृध्द, आजारी व्यक्ती यांना होत असतो पण त्याची दखल घेतली जात नाही. यावर नियंत्रण ठेवायचं असेल तर प्रशासन म्हणून सरकारला कडक धोरण ठरवावं लागेल. त्यासाठी नियमही कडक करावे लागतील. तरच यावर नियंत्रण मिळवणं शक्य होईल.
जनजागृतीच्या माध्यमातून हवा प्रदूषणाची समस्या लोकांसमोर मांडली जाते. पर्यावरण पूरक उत्सव साजरा व्हावा यादृष्टीने ही जनजागृती महत्वाची आहे. त्यातही जेव्हा घरातल्या लहान मुलांना फटाक्यांचे दुष्परिणाम समजावून सांगितले जातात तेव्हा ती मुलं फटाके वाढवण्यासाठी नकार देतात मात्र तरूण पिढीचा कल फटाके फोडून आनंद साजरा करण्यावर असतो. त्यामुळे लहानांकडे बघून मोठ्यांनी शिकण्याची गरज आहे असं वाटायला लागलं आहे. मुळातच कोणताही उत्सव साजरा केला जातो त्यामागे एक कारण असतं हे कारण समजून घेतलं पाहिजे. दिवाळी हा दिव्यांचा सण म्हणून साजरा करतो. दिवे उजळल्याने प्रदूषण नक्कीच होणार नाही. पर्यावरण पूरक असा सण साजरा होईल. फुलांची, रंगाची रांगोळी, दिव्यांची माळ, तोरण यामुळे घर आणि परिसरात उत्साही वातावरण निर्माण होतं. या वातावरणाचा आनंद घ्यायचा असेल तर प्रदूषण नियंत्रणात ठेवावं लागेल. या सणाच्या निमित्ताने होणारे कर्कश आवाज, हवा प्रदूषण टाळता यावं यासाठी अनेक कुटुंब शहरांच्या बाहेर एखाद्या पर्यटन ठिकाणी किंवा गावी जातात. तिथल्या शांत वातावरणात आपला सण साजरा करतात. मात्र हे सर्वांच्याच बाबतीत शक्य होत नाही. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लाखो रूपयांचे फटाके फोडून आनंद साजरा केला जातो. त्यानंतर रात्री शहरात होणारा फटाक्यांचा कचरा साफ करण्यासाठी सफाई कामगारांना रात्रभर रस्ते झाडावे लागतात. हा कचरा उचलताना त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असतात. आपण फटाके फोडून मोकळो होतो मात्र आपलासारखीच माणसं असलेल्या या कामगारांना सण साजरा करायला मिळत नाही. कर्तव्य म्हणून कचर् साफ करावा लागतो. त्यामध्ये असणारे फुलबाज्यांच्या तारा, न पेटलेला दारूगोळा हे उचलावं लागताना जखम होण्याची शक्यता असते. याकडे लक्ष द्यायला हवं. आपल्या सणासुदीचा आनंद त्यांनाही घेता यावा यासाठी पर्यावरण पुरक दिवाळी साजरी करायला हवी.
आपण सर्व जण उत्सव प्रिय आहोत. आपला आनंद हा सर्वांसोबत साजरा करण्यात आपल्याला समाधान मिळतं. त्यामुळे जसं गणेशोत्सवात अनेक घरांमध्ये शाडूच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली गेली आणि एका नव्या बदलाला प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद आता दिपोत्सवालाही मिळायला हवा. यासाठी सरकार सातत्याने जनजागृती करत आहे मात्र जोपर्यंत एक व्यक्ती म्हणून स्वतः काही नियम पाळले जातील तेव्हाच हे शक्य होईल. प्रत्येक बदलाची सुरूवात स्वतः पासून करायची असते त्यामुळे पर्यावरणपूरक पध्दतीने उत्सव साजरा करण्याची सुरूवातही तशीच व्हावी. आता तंत्रज्ञानाचा आधार घेऊन केवळ शुभेच्छा देत उत्सव साजरा करता येवू शकतो. त्यामुळे पर्यावरणालाही नुकसान होणार नाही आणि उत्सवाचा आनंदही मिळेल.
========================================================
========================================================