- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 23 ऑक्टोबर 2024
महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक 20 नोव्हेंबर 2024 रोजी होत असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 150 ऐरोली व 151 बेलापूर या दोन विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा व या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढावी यादृष्टीने विविध माध्यमांतून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या दोन्ही मतदार संघातील मतदान केंद्रांवर येणाऱ्या मतदारांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये याची विशेष काळजी घेतली जात आहे.
हे वाचा : भाषेचा अभिमान आणि संवर्धन
नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी 150 ऐरोली विधानसभा मतदार संघाच्या कार्यालयाला भेट देत तेथील सुविधा कक्षांची पाहणी केली. त्याचप्रमाणे सहा.निवडणूक निर्णय अधिकारी सुचिता भिकाने यांच्याशी चर्चा करुन निवडणूकीच्या अनुषंगाने मतदान केंद्रांवरील सुविधा तसेच इतर पूरक बाबींच्या पूर्ततेच्या व्यवस्थेत नवी मुंबई महानगरपालिका संपूर्ण सहकार्य करेल असे आयुक्तांनी सांगितले.
हे वाचा : समृध्दीला पर्यटनाची जोड
ऐरोली विधानसभा मतदार संघात 79 ठिकाणी 447 मतदान केंदे असून तेथे स्वच्छतागृह सुविधा तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पुरेशा प्रमाणात करावी असे आयुक्तांनी शहर अभियंता शिरीष आरदवाड यांना सूचित केले. घणसोली येथील नवी मुंबई सिटी स्कुलमध्ये सर्वाधिक मतदान केंद्रे असल्याने त्याठिकाणी भेट देत आयुक्तांनी पाहणी केली व नागरिकांची वाहने पार्किंग व्यवस्था, रॅम्प, पिण्याचे शुध्द पाणी, व्हिलचेअर, रांगेमध्ये बसण्याची व सावलीची व्यवस्था तसेच इतर सुविधांची पूर्तता करताना अधिक काळजी घेण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. अशाच प्रकारच्या सुविधा इतरही मतदानकेंद्रावर पुरविल्या जातील याची दक्षता घेण्याचे त्यांनी निर्देशित केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत ऐरोली व बेलापूर या दोन्ही मतदारसंघात आवश्यक सुविधा पूर्तीकरिता संपूर्ण सहकार्य करण्यात येत असून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी व 20 नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन करण्यात येत आहे.
========================================================