- स्वप्ना हरळकर/अविरत वाटचाल
नवी मुंबईः सततच्या कामाच्या व्यापातून चार दिवस कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींच्या सोबत घालावेत यासाठी खरंतर पर्यटनाचे बेत आखले जातात. सध्या दर शनिवार रविवारी किंवा सलग सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी हे त्याचंच उदाहरण आहे. आतापर्यंत न पाहिलेले ठिकाण पाहण्यासाठी, तिथली खाद्यसंस्कृती अनुभवण्यासाठी पर्यटन हा उत्तम पर्याय आहे.
निसर्गाच्या सान्निध्यात मनाला चार क्षण विसाव्याचे मिळावेत यासाठी केलेला हा प्रयत्न असतो.
कोविड महामारीच्या काळात अनेक कुटुंबांनी जग पाहायचं निश्चित केलं आणि पर्यटनाच्या माध्यमातून त्यासाठी योजना आखल्या. पिंज-यात डांबलेल्या पक्षाला त्याच्या अवकाशात मुक्त विहार करण्यावर जेव्हा बंधन घातलं जातं तेव्हा काय वाटत असेल हा अनुभव तेव्हा मनुष्य प्राण्याने घेतला. या अनुभवाने काही शहाणे झाले आणि त्यांनी जगण्याची दिशा बदलली. काहींना लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेल्यामुळे गावी जावं लागलं, काहींना आयुष्यातला प्रत्येक दिवस वेगळा अनुभव हवा आहे अशा सर्वांनी पर्यटन क्षेत्र व्यवसायाच्या दृष्टीने निवडलं आणि हे क्षेत्र अनेकांना खुणावू लागलं.
हे देखील वाचा : कोकणचे वायनाड व्हायला नको !
आपल्या देशातल्या कोणत्याही संस्कृतीमध्ये पाहुण्यांना देवाचा दर्जा दिला गेला आहे. त्यामुळे आलेल्या पाहुण्यांचं स्वागत नेहमीच होत असतं. याच स्वागताला कधी होम स्टे ची तर कधी कृषी पर्यटनाची जोड देण्याची नवीन संकल्पना आता रुजली आहे. यामध्ये आदरातिथ्यला असलेलं महत्व आणि घरच्या सारखं वातावरण यामुळे आता मोठ्या प्रमाणात पर्यटक त्यांच्याकडे वळले आहेत. मात्र अशा ठिकाणी जाताना काही गोष्टी लक्षात मात्र आवर्जुन ठेवल्या तर यजमान आणि पर्यटक दोघांचाही एकमेकांबद्दल आदर वाढतो. एक म्हणजे आपण ज्यांच्याकडे जात असतो तिथे घरच असतं त्यामुळे कचरा होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. बर्याच वेळा अशी केंद्र हा जैवविविधता भरपुर असलेल्या एखाद्या आडवाटेच्या गावात असतात त्यामुळे तिथला निसर्ग आपल्यामुळे कोणत्याही प्रकारे धोक्यात येणार नाही याची काळजी घेतली तर पर्यटनाचा आनंद वाढतो.
हे देखील वाचा : शिक्षणाचे वास्तव
शहरातून निसर्गात जात असताना प्लास्टिक, थर्माकोल यांचा वापर टाळला गेला तर निसर्गाला धक्का लागणार नाही. देशाच्याच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक भागात वेगवेगळ्या पध्दती आहेत. निसर्गाच्या वेगवेगळ्या छटा आहेत. प्रत्येक ऋतू वेगळा आहे. प्रत्येक जागा वेगळी आहे त्यामुळे या सर्वांचा आनंद जबाबदारीने आणि शांतपणे घ्या. याचाच अर्थ पर्यटन स्थळांवर नुकसान होणार नाही याची काळजी घेतानाच तिथली कोणतीही वस्तू आपल्या सोबत घेवून येवू नका. जे जिथे आहे ते तिथेच राहू द्या. येणाऱ्या अनेक पिढ्यांना ते पहायला तिथपर्यंत जावू द्या आणि त्यानिमित्ताने निसर्गाच्या विविध रुपयांचा अनुभव घेवू द्या. सध्या कोणत्याही ठिकाणी रिल्स, व्हिडिओ बनवण्याचं वेड लोकांना आहे. हे चित्रीकरण करताना कोणताही अपघात होणार नाही याची काळजी घेतली गेली तर नंतरच्या बचावकार्याचं दिव्य पार पाडावं लागणार नाही. बचाव पथकाला त्यासाठी आपला जीव धोक्यात टाकावा लागतो याचंही भान ठेवणं गरजेच आहे.
पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधीही विकसित होत आहेत हि आनंदाची गोष्ट आहे. यानिमित्ताने अनेक कुटुंबांची शहराकडे चाललेली पावलं आपल्या मातीत थांबली आणि त्यांची प्रगतीही सुरू झाली आहे. पर्यटकांना दाखवण्यासाठी म्हणून अनेक परंपरा, संस्कृती यांची जपणूक होत आहे.
हे वाचा : विधानसभा निवडणुकीसाठी बृहन्मुंबई क्षेत्रात १० हजार १११ मतदान केंद्रे
हे सर्व जरी सकारात्मक असलं तरी होम स्टे आणि कृषी पर्यटनाच्या जोडीने कॅम्पर व्हॅनचही प्रस्थ वाढत आहे. अनेकांकडून हा पर्याय सुरक्षित पर्याय म्हणून गौरवला जात आहे. त्यासाठी पर्यटन धोरणात बदल करून त्यादृष्टीने सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नव्याने होत आहे. तसंच किमान या पर्यटन स्थळांना जोडणारे रस्ते सुस्थितीत असलेल्या रस्त्यांची मागणीही पर्यटकांकडून केली जात आहे. याकडेही शासनाने लक्ष दिलं तर पर्यटनाचा आनंद नक्कीच वाढेल आणि नवीन उर्जा घेवून रोजच्या धकाधकीच्या जीवनात उत्साह राहिल हे नक्की.
========================================================
========================================================