- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 20 सप्टेंबर 2024
भारतरत्न एम.विश्वेश्वरय्या यांचा आदर्श नजरेसमोर ठेवून प्रत्येकाने नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे व त्याचा आपल्या कामात वापर केला पाहिजे आणि याचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे असे सांगत नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करुन शाश्वत भविष्यासाठी पर्यावरणाचे भान राखून काम केले पाहिजे असे अभियंता दिनी आयोजित विशेष कार्यक्रमात सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिका अभियांत्रिकी विभागाच्या वतीने नमुंमपा मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित ‘अभियंता दिन’ कार्यक्रमाप्रसंगी आयुक्तांनी उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड, अभियंते असलेले उदयोजक व लेखक व्याख्याते प्रफुल्ल वानखेडे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे तसेच इतर विभागप्रमुख, अधिकारी व अभियंते उपस्थित होते.
देशाच्या विकासात सर्वाधिक योगदान हे अभियांत्रिकी शाखेचे असून नवी मुंबईच्या आजवरच्या प्रगतीतही अभियंत्यांची भूमिका महत्वाची राहिली आहे असे मत व्यक्त करीत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी यापुढील काळात तंत्रज्ञानातील बदल लक्षात घेत प्रत्येकाने स्वत:ला अदययावत ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले. नियोजन, अंमलबजावणी व देखभाल या गोष्टींकडे अधिक बारकाईने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत आयुक्तांनी शहरातील नागरिकांना आनंददायी वातावरण उपलब्ध करुन देण्याच्या जबाबदारीने काम करायला हवे असे म्हटले. महानगरपालिकेचे अभियंते म्हणून लोकसेवेची एक चांगली संधी उपलब्ध झाली असून तिचा पूर्ण क्षमतेने वापर करायला हवा असे ते म्हणाले.
हे वाचा : इमारतींची पडझड आणि उदासिनता
यापुढील वर्षापासून अभियंता दिनी वर्षभरात चांगली कामगिरी करणाऱ्या अभियंत्यांचा सन्मान केला जावा व त्यासाठी निकष तयार करुन त्यानुसार निवड करावी असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी 15 सप्टेंबर रोजी साजरा होणारा अभियंता दिन त्या दिवशी गणेश विसर्जनाचे काम असल्याने डयुटी फर्स्ट म्हणत आज साजरा केला जात असल्याबद्दल अभियंत्यांच्या कृतीशीलतेचे कौतुक केले. अभियंत्यांमुळे मानवी जीवन सुखी झाले असल्याचे सांगत त्यांनी निवासयोग्य नवी मुंबई शहराच्या उभारणीत आपल्या अभियंत्यांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले.
अतिरिक्त आयुक्त तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी 1992 पासून महानगरपालिकेने केलेल्या विकास कामांचा आढावा घेताना यापुढील काळात आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अधिक उत्तम सेवा – सुविधा पुरविण्यासाठी अभियांत्रिकी विभाग कटिबध्द असल्याचे सांगितले. सध्या सुरु असलेले सायन्स पार्क, सेंट्रल लायब्ररी, ऐरोली नाटयगृह असे प्रकल्प दर्जेदार होण्यासाठी कृतीशीलपणे काम सुरू असल्याचे सांगत त्यांनी प्रत्येक वॉर्डात स्पोर्टस् कॉम्प्लेक्स उभारुन शहराच्या क्रीडा विकासासाठी भरीव काम केले जात असल्याची माहिती दिली.
जो सर्जनशील असतो तोच अभियंता – प्रफुल्ल वानखेडे
यावेळी सुप्रसिध्द लेखक व ऊर्जा क्षेत्रातील नामांकित उदयोजक प्रफुल्ल वानखेडे यांनी ‘शहर विकासातील अभियंत्यांचे योगदान’ या विषयावर अभ्यासपूर्णरित्या नर्मविनोदी शैलीत दिलखुलास संवाद साधला. स्वत: इलेक्ट्रिकल इंजिनिअर असल्याने आपल्या शैक्षणिक जीवनातील अनुभव खुसखुशीतपणे सांगत ‘जो सर्जनशील असतो तोच अभियंता असतो’ असे विविध उदाहरणे देत सांगून त्यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले.जेव्हा नाविन्यपूर्णता अंगिकारण्याची व वापरण्याची सुरुवात होते तिथूनच इंजिनिअर म्हणून खरा प्रवास सुरु होतो असे ते म्हणाले. माणसांसारखे शहरांचेही स्वभाव असतात असे सांगत त्यांनी अस्सल नवी मुंबईकर असल्याचा अभिमान व्यक्त केला.
अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी अभियंता दिनाच्या शुभेच्छा देत उपस्थितांचे आभार व्यक्त केले तसेच कार्यकारी अभियंता शुभांगी दोडे यांनी भारतरत्न सर एम.विश्वेश्वरय्या यांच्या चरित्राचे वाचन केले. कार्यकारी अभियंता वसंत पडघन यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करुन दिला. याप्रसंगी अभियंते मोठया संख्येने उपस्थित होते.
========================================================
========================================================