मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ योजना -20 ऑगस्ट रोजी नमुंमपा मुख्यालयात आणि 21 व 22 ऑगस्ट रोजी घणसोली आगारात विशेष शिबिर

  •  अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 19 ऑगस्ट 2024

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राबविण्यात येणा-या ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ योजनेंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेत 6 महिन्यांच्या कालावधीकरिता शिकाऊ उमेदवार म्हणून प्रशिक्षण देणेकामी 30 संवर्गातील एकूण 194 पदांसाठी 14  ऑगस्ट 2024 रोजी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पात्र 144 उमेदवारांची 6 महिन्यांच्या कार्य प्रशिक्षणाकरिता (इंटर्नशिप) निवड करण्यात आली आहे. उर्वरित 50 पदांकरिता यापूर्वीच जाहीर केल्याप्रमाणे मंगळवार 20 ऑगस्ट रोजी विशेष शिबीर महानगरपालिका मुख्यालयात संपन्न होत आहे.

तरी यावेळी शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले संपूर्ण नाव, पत्रव्यवहाराचा पूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी/दूरध्वनी क्रमांक, मेल-आयडी/शैक्षणिक अर्हता, जन्मतारीख, बँक ‍तपशील इ. कागदपत्रांसह सकाळी 10 वा. आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे असे सूचित करण्यात येत आहे. प्रथम येणाऱ्या उमेदवाराला प्रथम प्राधान्य देण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी. याबाबत सविस्तर जाहिरात, पदसंख्या  व शैक्षणिक अर्हता  शासनाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या अधिकृत पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

यामध्ये शिकाऊ उमेदवारांना शासनामार्फत दरमहा विद्यावेतन देण्यात येणार आहे. 12 वी पास उमेदवारांना रु.6,000/-, आय.टी.आय./पदविका धारक उमेदवारांना रु.8,000/- आणि पदवीधर/पदव्युत्तर उमेदवारांना रु.10,000/- विद्यावेतन दिले जाणार आहे.

हे वाचा : तिचा लढा… !

  नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमातही 81 वाहकांना शिकाऊ उमेदवार म्हणून योजनेंतर्गत संधी

अशाच प्रकारे नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमात शिकाऊ उमेदवार म्हणून 6 महिन्यांच्या कालावधीकरिता प्रशिक्षण देणे कामी वाहक संवर्गातील 81 पदांकरीता शैक्षणिक अहर्ता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून 20 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. याबाबत सविस्तर जाहिरात, पदसंख्या  व शैक्षणिक अर्हता  शासनाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या अधिकृत पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

याकरिता 12 वी पास, वैध आरटीओ परवाना व बॅज आवश्यक आहे तसेच मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असून वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष असावी. सदर शिकाऊ उमेदवारांना शासनामार्फत रु.6000/- प्रतिमाह विदयावेतन दिले जाणार आहे.

तरी पात्र उमेदवारांनी 21 ऑगस्ट व 22 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते सायं. 5.30 पर्यंत नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे घणसोली आगार, से-15, घणसोली येथे आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

हे वाचा : कोकणचे वायनाड व्हायला नको !

सदर नियुक्तीच्या अनुषंगाने शासनाकडील दि.09.07.2024 रोजीच्या  शासन निर्णयामधील सर्व अटी व शर्ती उमेदवारावर बंधनकारक राहतील याची नोंद घ्यावी असे सूचित करण्यात आले आहे.

तरी पात्र युवकांनी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’चा लाभ घेण्यासाठी दि. 20 ऑगस्ट 2024 रोजी महापालिका मुख्यालयात तसेच दि. 21 व 22 ऑगस्ट रोजी नमुंमपा परिवहन उपक्रमाच्या घणसोली आगार येथे उपस्थित रहावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

========================================================


========================================================