तिचा लढा… !

  • स्वप्ना हरळकर/ अविरत वाटचाल
  • नवी मुंबई, 18 ऑगस्ट 2024

गेल्या काही दिवसांपासून शहर, राज्य, देशपातळीवरून महिला, मुलांवरच्या अत्याचाराच्या बातम्या येत आहेत. एका घटनेतून बाहेर पडावं तोपर्यंत दुसरी घटना समोर येतेय. प्रत्येक घटनेमध्ये मुलीचा पूर्णपणे दोष आहे असंही नाही. काही घटनांमध्ये समाजातल्या विकृत मानसिकतेला बळी पडलेल्या आहेत तर काही घटना पुरूषी अहंकार दुखावला गेल्यामुळे घडलेल्या आहेत.

घटना कोणतीही असो त्याचा परिणाम आता तुमच्या आमच्या घरातल्या कोवळ्या मुलांपर्यंत दिसू लागले आहेत. स्वताच्या जिद्दीने, हिमतीवर यश खेचून आणण्यासाठी धडपडणाऱ्या मुलींना, महिलांना अत्याचाराला सामोरे जावे लागते यापेक्षा मोठं दुर्देव नाही. एखाद्या मुलीला, महिलेला कोणत्याही घटनेवर गप्प करायचे तर तिच्या चारित्र्यावरच आघात करायचा म्हणजे ती पार कोसळून जायला हवी ही मानसिकता कशी तयार होते. लैंगिक, शारीरिक अत्याचार, मानसिक खच्चीकरण हे आता न दिसणारी शस्त्र बनली आहेत. यावर नियम आणि कायदे कडक व्हायला हवेत. जोपर्यंत एखाद्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत धाक राहणार नाही.


जगाच्या कानाकोपऱ्यातच कशाला आपल्या आजूबाजूला महिला, मुलींवर अत्याचार होत असतात कधी ते आपल्याला दिसतात, कळतात तर कधी त्यांची जाणीव होतेच असंही नाही. जोपर्यंत एखादी महिला आपल्यावर झालेल्या अन्यायाची माहिती द्यायला पुढे येत नाही तोपर्यंत अगदी जवळच्या लोकांनाही त्याची माहिती नसते. मात्र दुर्दैवाने त्यानंतर तिला वारंवार अपमानित करण्याची स्पर्धा सुरू होते. कोणत्याही प्रसंगात तिच्या सोबत उभे राहण्यासाठी जोपर्यंत समाज म्हणून एक पाऊल आपण पुढे येत नाही तोपर्यंत अशी प्रत्येक ती एकटीच राहणार आहे. तिचा आधार असतो तो तिच्या जवळच्या व्यक्तींचा. त्यांनी साथ दिली तर हा लढा सोपा नक्कीच नाही पण सुसह्य होतो.

कोणत्याही मुलीला, महिलेला सन्मानाने कसं वागवलं पाहिजे याचं ट्रेनिंग खरंतर आपल्या घरातूनच प्रत्येक मुलाला मिळत असतं. एखाद्या मुलीला, महिलेला अडचणीच्या काळात कसं सावरावं, तिला मदत की करू शकतो हे घरातली महिलाच शिकवू शकते. त्यात तिला घरातल्या कर्त्या पुरूषाचं सहकार्य मिळालं तर पुढची पिढी संवेदनशील बनते. अर्थात अत्याचार हे केवळ मुलींवर होतात असं नाही कोवळ्या वयातली मुलेही अशा घटनांना बळी पडतात त्यामुळे मुलांशी संवाद असणं आता गरजेचं बनलं आहे. दिवसभरातली एखादीमनाला न पटणारी घटना, अस्वस्थ करणारा स्पर्श आणि एखादी विचित्र नजर यांबाबत मुलांनी आपल्या आईवडीलांशी बोलायलाच हवं. त्यांनी हा संवाद मोकळेपणाने करावा यासाठी तेवढा विश्वास आणि तेवढा आधार निर्माण करण्याचं काम हे आईवडीलांच आहे.


समाजातल्या प्रत्येक व्यक्तिच्या मनात आपण डोकावू शकत नाही त्यामुळे कोण काय विचार करतोय याचे अंदाज बांधू शकत नाही. पण आपल्यासोबत काहितरी वेगळं घडतंय हे प्रत्येकालाच जाणवत असतं त्याची माहिती जवळच्यांना द्यायला शिका. आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन असतो त्यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अनेक फिचर देण्यात आले आहेत त्यांचा वापर कसा करता येईल त्याचंही ज्ञान आपल्याला आता ठेवावं लागणार आहे. पोलिसांचे वेगवेगळे अॅप आहेत जे महिला, मुली, मुले यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बनविण्यात आले आहेत त्यांची माहिती आपल्या घरातल्यांना द्या.

मुली असोत किंवा महिला जोपर्यंत आपल्याला जाणवलेली गोष्ट सांगत नाहीत तोपर्यंत तुमच्या मदतीला कोणाही येवू शकणार नाहीत हे लक्षात ठेवा. आता वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईव्ह चा पर्याय असतो त्याचावापर तुम्हाला अडचणींच्या वेळी करता येईल. महिलांवर अत्याचार केल्याचा घटनांमधील आरोपीला झालेली शिक्षा ही पुढच्या वेळी होणारी घटना टाळण्यासाठी नक्कीच मदत करेल याचा विश्वास आहे.

========================================================


========================================================

========================================================