नवी मुंबईत मलेरिया, डेंग्यू प्रतिबंध शिबिरांना नागरिकांनी उत्स्फूर्त हजेरी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 6 ऑगस्ट 2024

सद्स्थितीत पावसाळा कालावधी सुरु असल्याने व त्यासाठीचा पारेषन कालावधी लक्षात घेता या कालावधीत हिवताप / डेंग्यू आजारांसह साथजन्य आजारांचा देखील फैलाव होतो. त्या अनुषंगाने हिवताप / डेंग्यू या किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवणेकरिता  नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  24 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रात एकुण 48 विशेष तपासणी व जनजागृती शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते.  या आरोग्य शिबिरांना नवी मुंबईकरांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावली.

साथरोग / जलजन्य आजार हे दूषित पाणी, वैयक्तिक व सभोवतालची अस्वच्छता, माशा, उघडयावरचे अन्न यामुळे होतो व यामध्ये ताप येणे, उलट्या होणे, अतिसार, अशक्तपणा, त्वचा कोरडी पडणे इत्यादी लक्षणे आढळतात. यावार उपाय म्हणून घर व परिसर जास्तीत जास्त स्वच्छ ठेवावा, पिण्याचे पाणी गाळून व उकळून प्यावे, अतिसार झाल्यास क्षारसंजीवनी मिश्रणाचा वापर करावा व अन्न सेवन चालू ठेवावे, सर्व कचरा घंटा गाडीत टाकावा, भाजीपाला स्वच्छ धुवून वापरावा, शिळे व उघड्यावरचे अन्न खाऊ नये याबाबत जनजागृती करण्यात आली.

या शिबिरांना सर्वच ठिकाणी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून ६  ऑगस्ट रोजी 24 ठिकाणी आयोजित केलेल्या शिबीरांना 11,562 नागरिकांनी भेट दिली असून, त्यांना हिवताप / डेंग्यूसारख्या किटकजन्य आजाराबाबत माहिती देण्यात आली तसेच 1466 रक्त नमुने तपासणी करण्यात आले. यापूर्वीही 3 ऑगस्ट रोजी आयोजित 24 ठिकाणच्या शिबिरांमध्ये 8053 नागरिकांनी भेट दिली असून, 1025 रक्तनमुने घेण्यात आले आहेत. या दोन्ही दिवसांमध्ये एकूण 19615 नागरीकांनी शिबिरांना भेट दिली असून, त्यांना हिवताप / डेंग्यूसारख्या किटकजन्य आजाराबाबत सविस्तर माहिती देण्यात आली तसेच 2491 रक्त नमुने तपासणी करण्यात आले.

या  शिबिरांचे वैशिष्ट म्हणून ॲनॉफिलीस व एडीस डासांची उत्पत्तीस्थाने प्रत्यक्षात दाखवून, तसेच नागरिकांना डासांच्या आळ्या प्रत्यक्ष दाखवून, घराभोवती व घरांतर्गत असणारी डासोत्पत्ती स्थाने उदा. पाणी साठवून ठेवलेले ड्रम हे ओढणी, धोतर किंवा साडीच्या कपड्याने बंदिस्त करणे, त्यासोबत पाणी साठविण्याची भांडी व टाक्या बंदिस्त करणे व आठवड्यातून एक दिवस स्वच्छ करुन कोरडे ठेवणे, भंगार साहित्य, टायर्स इत्यादी नष्ट करणे, छतावरील प्लास्टीक शिट, ताडपत्री यामध्ये पाणी साचू न देणे व ताप येताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे याबाबत नागरिकांना प्रोत्साहित करुन आवाहन करण्यात आले.
=======================================================

========================================================