- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 3 ऑगस्ट 2024
नवी मुंबई महापालिका हद्दीत काही दिवसांपूर्वीच एक चार मजली इमारत कोसळून ३ व्यक्तींचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज कोपरखैरणे विभागातील सेक्टर 12, बोनकोडे गाव येथे चार मजली इमारतीमधील एका फ्लॅटची गॅलरी संध्याकाळी सात वीसच्या सुमारास कोसळल्याची घटना घडलीआहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणी जखमी झालेले नसून सुरक्षेच्यादृष्टीने इमारतीमधील सदनिकाधारकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
Edit : इमारतींची पडझड आणि उदासिनता
नवी मुंबई महापालिका हद्दीत जुन्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जुन्या इमारतींच्या डागडुजीकडे दुर्लक्ष केल्यामुळे तसेच पुनर्विकासाचा मुद्दा कमालीचा रखडल्यामुळे अधून मधून घरांचे छत कोसळणे, भिंतींना तडे जाणे अशा दुर्घटना सुरुच आहेत. गेल्या शनिवारी बेलापूर येथे चार मजली इमारती जमीनदोस्त झाली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला होता.
त्यातच आता घराची गॅलरी कोसळल्याची घटना घडली आहे. बोनकोडे गावातील गोपालसिंग या चार मजली इमारतीच्या एका फ्लॅटची गॅलरी कोसळल्याने व इमारतीची स्थिती धोकादायक असल्याने तेथील रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 20 सदनिकांमधील कुटुंबांना अण्णासाहेब पाटील समाज मंदिर, कोपरखैरणे येथे स्थलांतरित करण्यात आलेले आहे.
इमारतीतून 70 रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आलेले असून त्यांच्या तात्पुरत्या निवासासह त्यांना जेवण व मूलभूत सुविधा महानगरपालिकेच्या वतीने पुरविण्यात येत आहेत. त्यावरील नियंत्रणासाठी कोपरखैरणे विभाग कार्यालयामार्फत नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
दरम्यान, नवी मुंबई शहरातील जुन्या इमारतींच्या डागडुजी तसेच दुरुस्तीच्या कामासाठी संबंधित गृहनिर्माण सोसायट्यांना तातडीने पावले उचलण्याचे निर्देश देण्यात यावे. जेणेकरून भविष्यात अशाप्रकारच्या दुर्घटना टाळता येतील, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
========================================================
======================================================