इमारतींची पडझड आणि उदासिनता

  • स्वप्ना हरळकर/अविरत वाटचाल 
  • नवी मुंबई, 28  जुलै 2024

बेलापूरमध्ये शहाबाज गावातील इंदिरा निवास ही इमारत शनिवारी पहाटे कोसळली. या दुर्घटनेत 3 रहिवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. अवघ्या १० -१२ वर्षांपूर्वी ही इमारत बांधली होती. निकृष्ट बांधकामामुळे इमारत कोसळून नागरिकांचा जीव जाण्याच्या घटना नवी मुंबईत वाढत आहेत.
पालिका दरवर्षी धोकादायक इमारतींची यादी जाहीर करते. यंदा या यादीत 527 इमारतींचा समावेश करण्यात आला आहे. दरवर्षी ही संख्या वाढत आहे. अशा घटना घडल्यानंतर पालिकेने आता अनधिकृत इमारतीचाही सर्वे करण्याची आता गरज आहे.

गावठाण भागातल्या इमारतींना मिळणारी परवानगी हाच कळीचा मुद्दा आहे. एकमेकांना चिकटून उभ्या राहिलेल्या, निकृष्ट दर्जाचे बांधकाम असलेल्या इमारती कोणाच्या आशिर्वादामुळे उभ्या राहतात हे वेगळे सांगायला नकोच. एखादी इमारत कोसळते तेव्हा त्यातले अनेक संसार रस्त्यावर येतात. पालिकेने त्यांची सोय तात्पुरत्या स्वरूपात केली तरीही कर्ज काढून घेतलेले घर डोळ्यासमोर कोसळणे यासारखे दुर्दैव आणि दुख: नाही.

काही दिवसांपूर्वी अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या नेरूळच्या त्रिमूर्ती इमारती पालिकेने सील केल्या. अशा इमारती उभ्या राहतात त्यांना पाणी पुरवठा, वीज पुरवठा केला जातो. पालिकेचे पाणी आहे म्हणजे इमारत अधिकृत असणार असा विश्वास सर्वसामान्य नागरिकांना असतो. बिल्डरच्या भूलथापांना बळी पडून लाखो रुपयांचे कर्ज काढून घर घेतले जाते. आणि असा अपघात झाल्यावर नशीबाला दोष दिला जातो.

मात्र या सर्वांना परवानगी देणा-या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई कधी होणार आहे. अशा इमारती उभ्या राहतात तेव्हा त्यामागे केवळ अधिकारीच नव्हे तर स्थानिक राजकीय वरदहस्तही असतो. त्यातच इमारती उभ्या राहताना त्याचे बांधकाम कोणत्या पध्दतीने केले आहे यासाठी मोजमापाचे काही दंडक वा नियम नाहीत. त्यामुळे ब्लिडर आपले पैसे वाचवण्यासाठी बांधकामावर योग्य तो खर्च करत नाही. त्यामुळे असे अपघात झाल्यानंतर इमारत मालकासोबतच बिल्डरवरही गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. जोपर्यंत यासाठी कडक नियम बनत नाहीत तोपर्यंत इमारत उभारणीत अशी कुचराई होत राहणार आहे.

नवी मुंबईत गावठाण भागातल्या इमारतींची ही त-हा असतानाच सिडको निर्मित इमारतीही आता धोकादायक स्थितीत पोहोचल्याचे वास्तव आहे. इमारतीच्या आतील छताचे प्लास्टर कोसळणे, पावसाच्या पाण्याने इमारत लिकेज होणे यांसारखे प्रकार घडत असतात. याबाबत महापालिकेचे विभाग अधिकारी, पालिकेच्या संबंधित विभागाचे अधिकारी यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही जेव्हा हे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात तेव्हा ही बाब खूपच गंभीर म्हणावी लागेल.त्यामुळे एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच याकडे लक्ष दिले जाणार आहे का असा प्रश्न आहे.

एखाद्या शहरात जेव्हा नागरिक राहायला येतात तेव्हा त्यांना सर्व पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हे स्थानिक प्रशासनाचे काम आहे. मात्र त्यासोबतच या सोयी देतानाच आपण अनधिकृत वसाहती तर निर्माण करत नाहीत याकडेही लक्ष असणे आवश्यक आहे. त्यासोबतच घराशी संबंधित तक्रारीची वेळेत दखल घेवून त्याचा निपटारा करणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित आस्थापनांच्या अधिका-यांची इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. एखादा नागरिक जेव्हा आपल्या घराशी, इमारतीशी संबंधित तक्रार करतो तेव्हा त्यामधील वास्तव समजून घेवून जेव्हा कारवाई होईल तेव्हाच अशा घटना थांबतील.

पाऊस आहे आणि अनेक इमारती धोकादायक स्थितीत आहेत अशावेळी त्यांच्या पुनर्विकासाची प्रक्रियाही राबविली जाणे गरजेचे आहे. एकविसाव्या शतकातील शहरात इमारत कोसळून अपघातात नागरिकांना जीव गमवावा लागतो हे दुर्दैव आहे. इमारतींचा ढाचा कमकुवत होताना वेळीच लक्षात आले तर त्याची दुरूस्ती करणे आवश्यक आहे.

========================================================