सोशल मिडियाचे मायाजाल

  • स्वप्ना हरळकर/ अविरत वाटचाल 
  • नवी मुंबई, २१ जुलै २०२४

रायगड जिल्ह्यात सह्याद्रीच्या एका कड्यावरून रिल्स बनवताना एक तरूणी दरीत कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. अगदी काही दिवसांपूर्वीची ही घटना सामाजिक माध्यमांच्या आभासी जगातली काही पहिली घटना नव्हती. पण या घटनेमुळे सामाजिक माध्यमांवरच्या आभासी जगाचे वास्तव दाखवणारी आहे.
पूर्वी टिकटॉक नावाचे एक अॅप होते. ज्यावर रिल्स केले जायचे आणि याच रिल्सच्या नादात अनेकांनी आपला जीव गमावल्यानंतर ते अखेर कायद्याने बंद करण्यात आले. त्यानंतर तिथले सर्व रिल्स स्टार इन्सटाग्राम, फेसबुक, युट्यूबवर रिल्स करू लागले. सध्या रिल्स स्टार हा अनेकांसाठी पोटापाण्याचा व्यवसाय आहे. रिल्स ला आलेले लाईक, कमेेंट, शेअर यांची चटक लागली आहे इतके काही तरूण वेडे झाले आहेत. मग एका रिल्सला लाखोंमध्ये व्हूज आणि लाईक यावेत यासाठी असे खटाटोप केले जातात. सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले नाही की अपघात होतात तसेच अपघात रिल्सच्या नादाताही होतात. पण त्या अपघातानंतर अपघातग्रस्तांचे शव मिळवण्यासाठी बचाव पथकाला जे उपद्व्याप करावे लागतात त्याकडेही लक्ष दिले पाहिजे. हजारो फूट दरीत उतरायचे, पाण्यात पोहायचे आणि प्रसिद्धीच्या वेडापायी जीव गमावलेल्यांना शोधायचे त्यासाठी दिवस दिवस मेहनत करणारे हे लोक खरे स्टार असतात पण त्यांची दखल फार कमी वेळा घेतली जाते.

आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करणे यात काहिच चुकीचे नसते. पण त्यासाठी वेडे होवून स्वत:चा जीव धोक्यात घालणे हे नक्कीच चुकीचे आहे. काहितरी अचाट, वेगळे करण्याच्या नादात मग काहिही केले जाते. त्यासाठी कधी डोंगरावरच्या कड्यावर चढायचे धाडस केले जाते.
तुमचा एक रिल हा अनेकांच्या रिअल आयुष्यात खूप बदल घडवून आणत असतो. एक रिल पाहून लहान मुलांनाही तसेच करायच असते.
सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्यामध्ये विविध सामाजिक माध्यमे आहेत ज्यावर प्रत्येकाचे स्वतंत्र अकाऊंट असते. त्यामुळे या आभासी जगात प्रत्येकजण व्यस्त आहे.

एखाद्या व्यक्तीने केलेल्या दोन चार पोस्ट, रिल्स आवडल्या की त्यांना फॉलो केले जाते आणि मग सतत ते काय करतात याचा अभ्यास केला जातो. कधीकधी एखादी रिल हिट झाली की सर्वच तो प्रकार फॉलो करतात. मग ट्रेंड येतात आणि ते पाळले जातात. काही रिल स्टार आपल्या 60 सेकंदाच्या रिल मध्ये जाहिरात करतात. ज्याचे त्यांना मानधनही मिळत असते. कळत नकळत एक नवीन अर्थव्यवस्था यामधून तयार होत आहे. काहि छोट्या मोठ्या उत्पादकांसाठी ही सोन्यासारखी संधी असते तर काहिंना निराशेच्या गर्तेत सापडण्यासाठी एक मार्ग असतो. आपण सामाजिक माध्यमांवर पोस्ट केली आणि ती फारशी पाहिली गेली नाही यामधून अनेकांना नैरा येत असते. तर दिवसभरातल्या प्रत्येक घडामोडींचे फोटो काढून त्याचे व्हिडिओ बनवून रिल टाकणारे अनेकजण आहेत. ज्यांना सतत चर्चेत राहायला आवडत असते, मग त्यासाठी कधी धोकादायक रिलचा आधार घेतला जातो.

सामाजिक माध्यमांमध्ये खूप मोठी ताकद आहे पण ती ताकद चांगल्या, सकारात्मक गोष्टींसाठीही वापरली पाहिजे. अनेक यूट्युबवर आहेत जे चांगल्या सकारात्मक बाबींवर रिल्स बनवत असतात. रिल्स बनवणे हे ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय आहे. पण आपल्या रिल मध्ये आपलाच जीव धोक्यात घालणे हे काही बरोबर नाही. काही सेकंदाची ती रिल म्हणजे छोटा चित्रपट त्यासाठी लाख मोलाचे आयुष्य फुकट का घालवायचे. रिल च्या या जगात सामान्य माणूस सहज सेलेब्रिटी होवू शकतो हे आता सर्वसामान्य नागरिकांना समजले आहे. फक्त एक क्लिक आणि आपण जगासमोर लाईव्ह जातो यामुळेही अनेक अपघात घडत आहेत.
हातात मोबाईल असलेल्या प्रत्येक व्यक्तीने यामधील अॅप, फिचर चा वापर कसा करायचा हे स्वतःच ठरवलं तर नक्कीच या आभासी जगातून बाहेर पडता येईल.

========================================================


=========================================================