मध्यान्ह भोजन अन्नाच्या दर्जात सुधारणा करा

आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे आदेश

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 4 जुलै 2024:

नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आज वाशी सेक्टर 16 इथल्या नमुंमपा शाळा क्रमांक 28 मध्ये अचानक भेट दिली. या भेटिदरम्यान त्यांनी तिथल्या कामकाजाची व सेवांची बारकाईने पाहणी केली आणि शाळा व्यवस्थापनामध्ये आमुलग्र सुधारणा करण्याचे निर्देश दिले. विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनादरम्यान देण्यात येणारे अन्न आयुक्तांनी स्वत: खाऊन पाहिले व अन्नाच्या दर्जात अधिक सुधारणा करण्याचे आणि त्याकडे दैनंदिन लक्ष ठेवण्याचे निर्देश मुख्याध्यापकांना दिले. अन्न तपासणा-या शिक्षकाच्या नावासह अन्नाच्या दर्जाबाबतची नोंद आहार पुरवठा नोंदवहीत दररोज न चुकता करावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात अन्न उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी आणि त्यांना ते खाण्यासाठी स्वच्छ व योग्य जागा उपलब्ध करून द्यावी अशाप्रकारे नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. विद्यार्थ्यांना भोजन / खाऊ खाण्यासाठी ताटे पुरविण्यात यावीत व ती देखील स्वच्छ असतील याची दक्षता घेतली जावी असे निर्देशीत करण्यात आले. भोजन झाल्यानंतर उरलेले अन्न पुरवठादाराने त्याच दिवशी परत घेऊन जाणे गरजेचे असून अन्न वितरणाची जबाबदारी असणा-या शिक्षकांनी याची विशेष दक्षता घ्यावी अशाही सूचना देण्यात आल्या.

स्वच्छतेबाबत नाराजी

शाळेतील अंतर्गत स्वच्छतेवर नाराजी व्यक्त करीत शाळेपासूनच विद्यार्थ्यांवर स्वच्छतेचे संस्कार होत असल्याने शाळेची अंतर्गत स्वच्छता व परिसर स्वच्छ असणे ही शिक्षकांची जबाबदारी असल्याचे सांगत यामध्ये त्वरित सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले. काही वर्गांमध्ये तसेच गच्चीवर टाकाऊ सामान तसेच बेंचेस कसेही टाकून ठेवण्याचे निदर्शनास आले. त्यांची विल्हेवाट लावून अथवा योग्य प्रकारे व्यवस्थित ठेवून नीटनेटकेपणा राहील याकडे कटाक्षाने लक्ष देण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले.

शाळेतील स्वच्छतागृहांचे सुधारणा काम सुरु असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. काम सुरू असले तरी स्वच्छतागृहांच्या ठिकाणी आवश्यक स्वच्छता असलीच पाहीजे असे कटाक्षाने सांगत शौचालयांच्या नियमीत स्वच्छतेमधून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

यावेळी शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या हजेरीपटाचीही आयुक्त महोदयांनी बारकाईने पाहणी केली. शिक्षकांनी आपल्या कामाचे महत्व ओळखावे तसेच शिक्षकांच्या वर्तनाचा व व्यक्तिमत्वाचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतो हे लक्षात घेऊन जबाबदारीने व आस्थेने काम करावे असेही आयुक्तांनी निर्देशित केले. शाळेच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करणे हे विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांनाही बंधनकारक असून शिक्षकांनी शिकवणे व विद्यार्थ्यांना घडविणे हे आपले प्रथम कर्तव्य असल्याचे लक्षात घेऊन त्यादृष्टीने स्वत:च्या क्षमता वाढवाव्यात असे आयुक्तांनी स्पष्ट केले. याकडे केंद्र समन्वयक आणि शिक्षणाधिकारी यांनी लक्ष ठेवण्याचे निर्देशित करण्यात आले.

शिक्षण अधिका-यांना पाहणी अहवाल सादर करण्याचे आदेश

केंद्र समन्वयक यांना नेमून दिलेल्या क्षेत्रातील शाळांच्या व्यवस्थापनावर व तेथील शैक्षणिक गुणवत्तेवर अधिक बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश देतानाच शिक्षण अधिकारी यांनीही शाळांना भेटी देऊन तेथील व्यवस्थापनाच्या सुनियोजितपणावर नियमीत लक्ष ठेवावे असे आयुक्तांनी स्पष्ट केले व शाळा पाहणीचा अहवाल आजच सादर करावा असे निर्देशित केले.

या शाळा इमारतीत तळमजल्यावर समावेशित शिक्षण दिले जात असून त्याठिकाणी दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष शिक्षण दिले जात आहे. त्याची माहिती घेत आयुक्तांनी यामध्ये अधिक गुणवत्तापूर्ण काम होण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या इटीसी केंद्राचे मार्गदर्शन घ्यावे असे सूचित केले.

पहिल्या व दुस-या मजल्यावर प्राथमिक शाळेचे वर्ग भरत असून तिस-या मजल्यावर माध्यमिक शाळेचे वर्ग भरत आहेत. या दोन्ही मुख्याध्यापकांनी परस्पर समन्वय राखून संपूर्ण शाळा इमारतीतील स्वच्छता आणि इतर सुविधांबाबत दक्ष राहण्याचे निर्देश देत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नमुंमपा अखत्यारितील सर्व शाळांमध्ये या सूचनांची अंमलबजावणी करावी असे स्पष्ट निर्देश शिक्षणाधिकारी यांना दिले.
——————————————————————————————————