पावसाळा कालावधीत मदतकार्यासाठी सुसज्ज रहा

नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 18 जून 2024

 यावर्षी अदयापपर्यंत पुरेशा प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली नसून येत्या काही दिवसात मोठया प्रमाणावर पावसाला सुरुवात होईल हे लक्षात घेऊन सतर्कता राखावी असे निर्देशित करीत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दरडप्रवण क्षेत्राकडे विशेष लक्ष द्यावे असे निर्देश दिले.

विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत आयुक्तांनी नाले व गटारे सफाईच्या कामांचा आढावा घेत नाल्यांच्या प्रवाह क्षेत्रात अजूनही काही झोपडया शिल्लक असतील तर संबधित विभाग अधिकारी यांनी पुन्हा बारकाईने प्रत्यक्ष पहाणी करावी व अशा झोपड्या आढळल्यास संभाव्य हानी टाळण्यासाठी त्या त्वरित हटवाव्यात असे स्पष्ट निर्देश दिले.

पाऊस लांबल्यामुळे सद्यस्थितीत नमुंमपा क्षेत्रात आठवडयातील तीन दिवस संध्याकाळच्या वेळेत पाणी पुरवठा देता येत नाही यामागील भूमिका नागरिकांनी समजून घेतली आहे. महानगरपालिकेच्या मोरबे धरणात आणखी 39 दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असून पुरेशा प्रमाणात पाऊस पडावा याच्या आपण प्रतिक्षेत आहोत. त्यानुसार पाणी पुरवठयाचे नियोजन केले जात आहे. त्याची माहिती वेळोवेळी नागरिकांना देण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या.

यावर्षी पूर्वापार पध्दतीने नाल्यांमधील प्रवाहात येणारे अडथळे दूर करून नालेसफाई करण्यात आली असून आगामी काळात नाल्यांची गाळ काढून सखोल सफाई करणेबाबत नियोजन करावे असे आयुक्तांनी सूचित केले. तसेच धारण तलावांच्या सफाईबाबतही आवश्यक परवानग्या मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

पावसाळी कालावधीत उद्भवणारे आजार लक्षात घेऊन आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात तसेच साथरोगांवरील आवश्यक औषधांची उपलब्धता करुन ठेवणेबाबत आरोग्य विभागास निर्देशित करण्यात आले. पावसाळा लांबल्यामुळे डासांच्या प्रमाणात वाढ होईल अशी नैसर्गिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रभावीपणे  प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.

पावसाळी कालावधीत संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी जाहीर केलेल्या अतिधोकादायक इमारतींमधील रहिवास वापर पूर्णपणे थांबविण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशित करतानाच आपत्कालीन निवा-याच्या दृष्टीने समाजमंदिरे, विविध भवने व इतर अनुषांगिक जागांची उपलब्धता करणेबाबत तसेच सिडकोकडे यासाठी जागा उपलब्धतेबाबत पाठपुरावा करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.

घाटकोपर, मुंबई येथील दुर्घटनेनंतर नवी मुंबई महानगरपालिकेने अत्यंत तत्परतेने अनधिकृत होर्डिंग निष्कासीत करण्याची कार्यवाही केली असून नोंदीत 53 पैकी 47 अनधिकृत होर्डिंग हटविलेले आहेत. उर्वरित 4 एमआयडीसी अखत्यारितील होर्डिंगही त्यांचेमार्फत त्वरित हटविण्यासाठी अधिक पाठपुरावा करण्यात यावा असे आयुक्तांनी निर्देशित केले.

परवाना विभाग तसेच नगररचना विभाग यांच्यामार्फत दिल्या जाणा-या परवानग्या, परवाने, प्रमाणपत्रे याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर अपलोड करण्याचे निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले. त्याचप्रमाणे जन्मदाखले संबधितांपर्यंत पोहचविण्यासाठी ऑनलाईन प्रणाली सक्षम करावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले. या सर्व बाबींवर तत्परतेने कार्यवाही करण्याचे निर्देशित करण्यात आले.

15 जूनपासून यंदाच्या शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली असून साधारणत: 6 हजार नवीन विद्यार्थी नमुंमपा शाळांमध्ये प्रविष्ट झाले आहेत. त्यांच्यासाठी पुरेशी बैठक व्यवस्था असल्याबाबतचा आढावा आयुक्तांनी घेतला. त्याचप्रमाणे शाळांमधील डिजीटल बोर्ड सुविधा, प्रयोगशाळा, ग्रंथालय, मैदाने अशा सेवांचाही आढावा घेण्यात आला.

याप्रसंगी उपस्थित अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व शिरीष आरदवाड तसेच इतर विभागप्रमुख यांच्याकडून शासन, लोकन्यायालय आदी स्तरावरील पत्रव्यवहाराचा आढावा घेण्यात आला.

========================================================

========================================================