आचारसंहिता कालावधीत विनापरवानगी सभा घेतल्याप्रकरणी संजीव नाईकांविरोधात तक्रार

काँग्रेसचे नेते रविंद्र सावंत यांची निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार

  • अविरत  वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 15 जून 2024

मुंबई पदवीधर,कोकण पदवीधर तथा कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून 26 जुन 2024 रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता कोकण परिक्षेत्रात लागू आहे. मात्र आचार संहिता लागू असतानाही  ठाणे लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार व भाजप नेते संजीव गणेश नाईक यांनी दिनांक 14/06/2024 रोजी अग्निशमन दल नवी मुंबई आणि नवी मुंबई महानगरपालिका सार्वजनिक रुग्णालय वाशी येथील कर्मचाऱ्यांची विनापरवाना बैठक घेवून त्यांच्या विविध समस्यांची सोडवणूक करण्याचे आमिष व प्रलोभन दाखवल्याचा आरोप करीत या बैठकीत अनेक कामगारांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्याचे आश्वासन दिल्याची तक्रार नवी मुंबई काँग्रेस नेते रविंद्र सावंत यांनी सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्याकडे केली आहे.

आचारसंहिता कालावधीत राजकीय नेत्यांनी विनापरवाना सभा घेणे व मतदारांना प्रलोभने दाखवणे म्हणजे आचारसंहितेचा भंग करण्याचा प्रकार आहे. अग्निशमन दल नवी मुंबई आणि नवी मुंबई महानगरपालिका सार्वजनिक रुग्णालय वाशी येथील कर्मचारी, अग्निशामक,स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लिपिक, अधिक्षक आदी कर्मचारी  हे  पदवीधर आहेत आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे मतदार आहेत. मतदारांना विनापरवानगी विविध प्रलोभने दाखवणे हे आदर्श आचारसंहितेचे निर्विवाद उल्लंघन असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. तसेच याप्रकरणी संबंधितांवर योग्य त्या कलमांखाली गुन्हा दाखल करावा, अशी मागणी  रविंद्र सावंत यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

========================================================

========================================================