घराच्या अमिषाने महिलेची १५ लाखांना फसवणूक

श्री समर्थ कृपा डेव्हलपर्सचा मालक रंजीत नाईकसह तिघांविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 13 जून  2024

उलवे येथील एक सदनिका विक्री करण्याचे अमिष दाखवून एका महिलेची १५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी नेरुळ, दारावे येथील रणजित नाईक याच्यासह तीन जणांविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार, कळंबोली परिसरात राहणाऱ्या तक्रारदार महिलेने उलवे पुष्पक नगर येथील एक फ्लॅट खरेदी करण्याबाबत नेरुळ दारावे गाव येथील श्री समर्थ कृपा डेव्ललपर्सशी संपर्क साधला. फिर्यादीच्या तक्रारीनुसार श्री समर्थ कृपा डेव्ललपर्सचा मालक आरोपी रंजीत भालचंद्र नाईक , वय-३४वर्षे,( रा. दारावेगांव, नेरुळ ), एजंट महेंद्र नारायण पाटील (आगरोली गाव, सीबीडी बेलापुर) आणि लक्ष्मीबाई महादेव सातपुते (रा.जुईनगर गाव,  नेरुळ) यांनी २९ एप्रिल २०२२ पासून आज पर्यंत सदनिकेच्या विक्री व्यवहारप्रकरणी  १५ लाख रुपये बॅंक खाते तसेच रोख रक्कमेच्या रुपात स्वीकारली. मात्र आरोपींनी ठरलेल्या कालावधीत सदनिका देण्यास टाळाटाळ केली तसेच पैसे परत देण्यासही टाळाटाळ केली.

याप्रकरणी वारंवार पैशाची मागणी करूनही रंजीत नाईक आणि अन्य दोन्ही आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ करू लागले तसेच मारण्याची धमकी दिल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदार महिलेने अखेरीस नेरुळ पोलीस ठाण्यात धाव घेत श्री समर्थ कृपा डेव्ललपर्सचा मालक आरोपी रंजीत भालचंद्र नाईक आणि अन्य दोन आरोपींविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. याप्रकरणी तपास केल्यानंतर १ जून रोजी नेरुळ पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात फसवणूक तसेच मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नेरुळ पोलिसांनी याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरु केली आहे.

========================================================