राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेसाठी अर्ज दाखल

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 13 जून 2024

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर  आता  राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने  सुनेत्रा अजित पवार यांनी आज विधानभवनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष  खा. प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे,  मंत्री  छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Lead Story : देवेंद्र फडणवीसांची स्मार्ट खेळी

लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटातर्फे सुनेत्रा पवार तर शरद पवार गटातर्फे सुप्रिया सुळे यांच्यात सरळ लढत झाली होती. या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत  सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना ७ लाख ३२ हजार ३१२  मते मिळाली तर सुनेत्रा पवार यांना ५ लाख ७३ हजार ९७९ इतकी मते मिळाली. सुप्रिया सुळे यांना १ लाख ५८ हजार ३३३ इतकी अधिक मते मिळाली.

सुनेत्रा पवार यांच्या पराभवामुळे  राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला नुकत्याच झालेल्या केंद्र सरकारमध्ये वाटा न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीची भावना पसरलेली आहे. अशातच राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही बिनविरोध निवडणूक होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

News : कोंकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत 13 उमेदवार रिंगणात

या  जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर होते. मात्र ऐनवेळी छगन भुजबळ यांच्याऐवजी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली गेल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा सुरु झाली होती. या चर्चेनंतर स्वतः छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांना सर्वानुमते उमेदवारी  दिली असल्याचे सांगत आपण  नाराज नसल्याचे सांगत पक्षाच्या निर्णयाचा मान राखणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राज्यसभेच्या माध्यमातून केंद्रीय राजकारणात सक्रीय होण्यासाठी सज्ज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

========================================================

========================================================