- सिद्धार्थ हरळकर/ अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 9 जून 2024
नवी मुंबईः ठाणे लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे नरेश म्हस्के मोठया मताधिक्याने विजयी झाले. म्हस्के यांच्या विजयात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच रिपब्लिकन पक्षाचा हातभार लागला. मात्र म्हस्के यांना नवी मुंबईतून मिळालेला प्रतिसाद आता चर्चेचा विषय ठरू लागला आहे. नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईत भाजप नेते गणेश नाईक समर्थकांनी जोरदार विरोधाची भूमिका घेतली. . मुंबईपयर्ंत धाव घेत त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मात्र युतीचा धर्म पाळा असे फर्मान आल्यामुळे नाईक समर्थकांनी विरोधाच्या तलवारी म्यॅन केल्या.
नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीला नवी मुंबईतून भाजप नेत्यांचा झालेला विरोध पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकली. विजय चौगुले यांनीही जोरदार मोर्चेबांधणी करीत मित्र पक्षांचे समर्थन मिळू शकेल अशा नेत्यांशी चर्चा केली. त्याचा परिणाम नवी मुंबईत नरेश म्हस्के यांचा मोठ्या प्रमाणात प्रचार झाला. शेवठी ठाणे लोकसभा मतदारसंघात प्रथमच नरेश म्हस्के मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले. या विजयोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून नवी मुंबईतून विजय चौगुले यांचा वावर प्रकर्षाने जाणवला.
Lead Story : देवेंद्र फडणवीसांची स्मार्ट खेळी
नरेश म्हस्केंना नवी मुंबईतून इतर विधानसभांच्या तुलनेत कमी मते मिळाली आहेत. त्यामुळे साहजिकच भाजपच्या नाईक समर्थकांनी प्रारंभी केलेला विरोधाचा हा परिणाम आहे का, अशी चर्चा आता रंगली आहे. त्यामुळे म्हस्केंच्या विजयासाठी विजय चौगुलेंनी अधिक मेहनत घेतली असेच काहीसे चित्र दिसून येते.
लोकसभेची लढाई आता संपली असून प्रत्येक पक्ष काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागणार आहे. लोकसभेत केलेल्या मेहनतीचे फळ म्हणून विजय चौगुले यांच्या पारड्यात ऐरोली विधानसभा मतदार संघातून उमेदवारीचे बक्षिस मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र मागचा इतिहास बघता विजय चौगुले स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याऐवजी चिरंजीव ममित चौगुले यांच्यासाठी प्रयत्न करतील, अशी शक्यता अधिक वाटते. त्यामुळे विधानसभेसाठी विजय चौगुले यांनी आक्रमक भूमिका घेतली तर लोकसभेच्या एकत्र आलेल्या मित्रपक्षांची कोंडी होईल. विशेषतः त्याचा फटका भाजपचे ज्येष्ठ नेते आ. गणेश नाईक यांना बसू शकतो. कारण विधानसभेसाठी मित्रपक्षही स्वतंत्र लडण्याच्या मानसिकतेत असतील.
विधानसभा निवडणुकीनंतर महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजेल. आर्थिकदृष्ट्या श्रीमंत असणारी नवी मुंबई महानगरपालिका म्हणजेच नवी मुंबईचा गड आपल्या ताब्यात ठेवण्यासाटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विजय चौगुले यांना अदिक बळ देतील हे नक्की. ही बाब गेली अनेक दशके नवी मुंबईवर एकहाती सत्ता राखणाऱ्या भाजपचे मातब्बर नेते गणेश नाईक यांच्यासाठी कदाचित काहीसे त्रासाचे ठरू शकेलही. या सर्व बाबींचा विचार करता भाजप नेतृत्व तसेच स्वतः गणेश नाईक कोणती रणनिती आखतील, याकडे आता नवी मुंबईकरांचे लक्ष लागून राहणार आहे.
========================================================
=====================================================