प्रवाशांशी हुज्जत घालून भाडे नाकारणे, वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या रिक्षा चालकांना दणका
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, १० एप्रिल २०२४
रिक्षाचालकांकडून सातत्याने होणारे नियमांचे उल्लंघन तसेच प्रवाशांशी हुज्जत घालून भाडे नाकारण्याच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबलून तब्बल १३८ रिक्षाचालकांवर कारवाई केली. नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे प्रवाशांशी वाद घालणाऱ्या तसेच नियम तोडणाऱ्या रिक्षाचालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
प्रवाशांना इच्छित स्थळी सोडण्याऐवजी भाडे नाकारणे, प्रवाशांची उर्मटपणे वागणे तसेच नियमांना पायदळी तुडवून धोकादायकपद्धतीने रिक्षा चालविणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात सासत्याने वाहतूक पोलिसांकडे तक्रारी येत असल्याची गंभीर दखल नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी घेतली. पोलीस आयुक्त भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल बोंडे यांनी १० एप्रिल रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मुजोर रिक्षाचालकांविरोधात धडक कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविली.
लीड स्टोरी: आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्हयांवर लक्ष
या विशेष मोहीमेअंतंर्गत वाहतुकीचे नियम न पाळता नियमांची पायमल्ली करून बेजबाबदारपणे रिक्षा चालविणाऱ्या तसेच प्रवाशांशी हुज्जत घालून भाडे नाकारणाऱ्या तब्बल १३८ रिक्षा चालकांवर कारवाई केली. रिक्षाचालकांविरोधात केलेल्या धडक कारवाईबद्दल नागरिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.
ठळक बातमी : किनारपट्टी सुरक्षेसाठी सागर रक्षक एप (App)
दरम्यान, नवी मुंबई वाहतूक विभागाकडून नवी मुंबई कार्यक्षेत्रातील रिक्षा युनियन नेते तसेच रिक्षा मालक- चालक यांची नियमितपणे एकत्रित बैठक घेऊन सर्व रिक्षा चालकांनी वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत आवाहन करण्यात येते. तरीही काही रिक्षाचालकांमुळे नागरिकांना त्रास होतो, तसेच वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो. त्यामुळे रिक्षा चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावे तसेच नागरिकांनी सौजन्याने वागावे असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
========================================================
=======================================================
========================================================