- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 21 मार्च 2024
सिडको महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत असणारे सनदी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी आज शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारला. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आयुक्त दालनात प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, शहर अभियंता संजय देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, मुख्य लेखा परीक्षक जितेंद्र इंगळे आणि इतर विभागप्रमुखांनी आयुक्तांचे स्वागत केले.
भारतीय प्रशासकीय सेवेतील सन 2013 च्या बॅचचे आय.ए.एस. अधिकारी असणाऱ्या डॉ. कैलास शिंदे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री सचिवालय व राज्यपाल सचिवालय येथे उपसचिव पदावर उत्तम कामगिरी केलेली आहे. सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना 2018 मध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशातील सर्व 685 जिल्हयांमधून प्रथम क्रमांकाच्या स्वच्छ जिल्हयाचा गौरव पंतप्रधान यांच्या हस्ते स्विकारण्याचा बहुमान लाभला तसेच त्यापुढील वर्षीही स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेत भारत सरकारमार्फत विशेष पुरस्काराचा मान लाभला. पुढे पालघर जिल्हयाचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी तेथील आदिवासीबहुल भागात लोककल्याणकारी काम केले. तसेच कोव्हीड काळात व चक्रीवादळातही आपत्ती निवारणाचे महत्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल राज्य व केंद्र सरकारमार्फत घेण्यात येऊन सन्मानित करण्यात आले आहे.
TOP NEWS : आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्हयांवर लक्ष – पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे
सिडको महामंडळात सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून डॉ. कैलास शिंदे यांनी महामुंबई, विमानतळ, गोल्फ कोर्स, निर्मितीत महत्वपूर्ण कार्य करण्यासोबतच वसाहत व पणन, सिडको क्षेत्रातील पाणीपुरवठा तसेच इर्शाळवाडी पुनर्वसन कार्यातही भरीव कामगिरी केलेली आहे. आपल्या कारकिर्दींत शासकीय योजना जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांनी नियोजनबध्द काम केलेले असून शासकीय कामकाज प्रक्रिया ऑनलाईन करुन नागरिकांना कमीत कमी वेळेत व श्रमात आवश्यक सुविधा उपलब्धतेवर त्यांनी भर दिला आहे. कार्यभार स्विकारल्यानंतर आयुक्तांनी विभागप्रमुखांची बैठक बोलावून प्रत्येक विभागाच्या कामाची माहिती घेतली व विभागनिहाय कामकाजाचा स्वतंत्र आढावा व क्षेत्रभेटींचे नियोजन केले.
========================================================
========================================================