स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणाबाबत अनुप कुमार यांचे माहितीपूर्ण व्याख्यान

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 6 मार्च 2024

 भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी पर्वानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ऐरोली येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामधील एक अभिनव उपक्रम तरुणाईच्या उत्साही उपस्थितीत संपन्न झाला. यामध्ये वर्धा येथील नालंदा ॲकेडमीचे संस्थापक अनुप कुमार यांनी ‘स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षण’ या विषयावर युवकांशी थेट संवाद साधत अनेक बाबींवर प्रकाशझोत टाकला.


सर्वसाधारणपणे आपल्याकडील युवकांचे ध्येय सरकारी नोकरी हे असते. यासाठी युपीएससी, एमपीएससी अशा स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी जीवनातील महत्वाची चार ते पाच वर्षे द्यावी लागतात. या पलिकडेही मोठे विश्व असून तिथेही करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत, त्याचा लाभ घेतला पाहिजे असे अनुप कुमार यांनी सांगितले. मुलांनी चांगले उच्चशिक्षण घ्यावे, ज्ञानी व्हावे हे लक्ष्य नजरेसमोर ठेवून वाटचाल केली पाहिजे असे सांगत त्यांनी उच्च शिक्षणाच्या तसेच नेाकरी व्यवसायाच्या अनेक पर्यायांचा खजिना उपस्थितांसमोर खुला केला. याप्रसंगी समाजविकास विभागाचे उपआयुक्त  किसनराव पलांडे, दिघा विभागाचे सहा. आयुक्त  डॉ. कैलास गायकवाड, कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे, सर्जेराव परांडे आदी उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील युवक-युवतींच्या मोठया संख्येने उपस्थितीत संपन्न झालेल्या व्याख्यानात अनुप कुमार यांनी कोणत्याही स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना त्यामध्ये गणित आणि इंग्रजी हे महत्वाचे विषय असल्याचे सांगितले. सर्वसाधारणपणे या विषयांबाबत तरुणांच्या मनात न्यूनगंड दिसून येतो. मात्र ही अपरिहार्य गरज असल्याचे लक्षात घेऊन या विषयांकडे गांभीर्याने बघावे असे त्यांनी सांगितले. त्यासाठी गणिताचा सराव आणि इंग्रजी वर्तमानपत्राचे वाचन ही दैनंदिन सवय बनवावी असा मंत्र त्यांनी दिला.


नालंदा ॲकेडमीच्या माध्यमातून तीन वर्षात 37 विदयार्थी परदेशी शिक्षणासाठी पाठविल्याची माहिती देत ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्‍ध करुन देण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे त्यांनी सांगितले. आर्थिक कारणांमुळे हुशार मुले उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेत याकरिता करण्यात येत असलेल्या कामांचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. उच्च शिक्षण हे जेएनयू सारख्या नामांकित संस्थेतून घेतल्यामुळे आपल्या अनुभवाच्या कक्षा रुंदावतात व अभ्यासासाठी पोषक वातावरण आणि तशा प्रकारची संगत लाभल्यामुळे प्रगतीच होते हे अनेक अनुभव सांगत त्यांनी पटवून दिले.

========================================================


========================================================

=======================================================