- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 4 मार्च 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या कल्याण येथे मोठ्या संख्येने नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या विशेष कार्यक्रमाप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दहा हजारहून अधिक लाभार्थी व नागरिकांनी उपस्थित राहत शासकीय योजनांची माहिती तसेच प्रत्यक्ष लाभ घेतला.
या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शित करण्यात आलेल्या लोककल्याणकारी योजना तसेच स्वच्छता व पर्यावरणविषयक माहितीपूर्ण प्रदर्शनी स्टॉलला नागरिकांनी मोठया संख्येने भेट देऊन महानगरपालिकेच्या कामांचे कौतुक केले. यामध्ये विशेषत्वाने स्टॉलजवळ असलेल्या ओलू, सुकू, घातकू तसेच सफाईमित्र व यूज टॉयलेट या मॅस्कॉटसोबत सेल्फी व छायाचित्रे काढून घेण्यासाठी नागरिकांनी पसंती दर्शविली. यामध्ये लहान मुले व तरुण-तरुणींचे प्रमाण मोठे होते.
या प्रदर्शनी स्टॉलला नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व विजयकुमार म्हसाळ यांच्यासह तसेच ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले, भिवंडी निजामपूर मनपा आयुक्त अजय वैद्य, उल्हासनगर मनपा आयुक्त अझिझ शेख, अति. जिल्हाधिकारी मनिषा जायभाय-धुळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील आणि इतर मान्यवरांनी भेट देत महानगरपालिकेच्या प्रदर्शनी स्टॉल रचनेची व उल्लेखनीय कामांची प्रशंसा केली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका प्रदर्शनी स्टॉलमध्ये महिला, बालके, युवक-युवती, मागासवर्गीय घटक, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक अशा विविध घटकांच्या विकासाकरिता महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच आरोग्य विषयक योजना व उपक्रम यांची माहिती प्रदर्शित करण्यात आली होती. तसेच त्याबाबतची माहितीपत्रकेही वाटण्यात येत होती. विशेष म्हणजे अरुंद रस्त्यांवर अग्निविमोचनाची कार्यवाही करण्यासाठी नमुंमपा अग्निशमन दलाच्या ताफ्यात असलेली फायर सेफ्टी दुचाकी वाहने त्या ठिकाणी ठेवण्यात आली होती. अशाचप्रकारे दुसऱ्या स्टॉलवर नवी मुंबई महानगरपालिकेचे स्वच्छता, सुशोभिकरण व पर्यावरण क्षेत्रातील राष्ट्रीय व राज्यस्तरीय मानांकन याबाबतची माहिती व त्याची प्रमाणपत्रे आणि सन्मानचिन्हे प्रदर्शित करण्यात आली होती. या स्टॉलला भेटी देणाऱ्या सर्वच मान्यवरांची या सन्मानचिन्हांसह छायाचित्रे काढण्यात आली.
महिला, बालके, मागासवर्गीय घटक, दिव्यांग अशा विविध समाज घटकांना तब्बल पन्नासहून अधिक योजनांद्वारे लाभ देणारी महानगरपालिका ही नवी मुंबईची ओळख तसेच 1 एप्रिल 2023 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत 1 लाख 52 हजार 660 लाभार्थ्यांना विविध योजनांतर्गत लाभ देण्यात आला आहे. हे लक्षात घेत महानगरपालिकेच्या आठही विभाग कार्यालय क्षेत्रातून विविध योजनांचे साधारणत: 10 हजारहून अधिक लाभार्थी कार्यक्रमस्थळी जाणार असल्याने आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार अतिरिक्त् आयुक्त सुजाता ढोले यांच्या नियंत्रणाखाली लाभार्थींचे कार्यक्रम स्थळी येणे – जाणे तसेच त्यांची खानपान व्यवस्था याविषयी विभागनिहाय सूक्ष्म नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार प्रामुख्याने समाजविकास, शिक्षण, आरोग्य, एनएमएमटी व सर्वच संबंधित विभागांनी आयुक्तांच्या आदेशांची सुयोग्य अंमलबजावणी केल्याने हा कार्यक्रम सुव्यवस्थित रितीने संपन्न झाला.
========================================================
========================================================
========================================================