मराठी भाषा गौरव दिनानिमित्त 24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान वाशीत ‘उत्सव मराठी भाषेचा, सुलेखन संस्कृतीचा’

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 22 फेब्रुवारी 2024 

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. याच अनुषंगाने 27 फेब्रुवारी रोजीच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी यांच्या सहयोगाने सुलेखनातून मराठी भाषेचा गौरव वाढविणारा विशेष उपक्रम 24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात राबविला जात आहे.

नवी मुंबईचे भूषण असणारे जगप्रसिध्द सुलेखनकार  अच्युत पालव यांच्या मार्गदर्शनाखाली हे सुलेखन प्रदर्शन 24 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारीपर्यंत वाशी येथील शिवाजी महाराज 24 तास खुले राहणार असून शनिवार 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.

या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी यामधील सुलेखनकार शनिवार  24 फेब्रुवारी 2024 रोजी व रविवार  25 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत सुलेखन प्रात्यक्षिके सादर करणार आहेत.

 उत्सव मराठी भाषेचा या सुलेखन प्रदर्शनात मराठी भाषेतील वाचनीय कथा, कविता, विचार यांचे सुलेखनातून प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनात अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या ४० कलाकृती मांडण्यात येणार असून सुप्रसिध्द साहित्यिक पु.ल. देशपांडे, कुसुमाग्रज, ना.धों. महानोर, इंदिरा संत, शांताबाई शेळके अशा नामवंत कवींच्या कविता व वाचनीय साहित्य सुलेखनातून पाहण्याची संधी रसिकांना उपलब्ध होणार आहे.

========================================================


========================================================