दोन दिवसात पुढची राजकीय भूमिका जाहीर करू

दोन दिवसात पुढची राजकीय भूमिका जाहीर करू

अशोक चव्हाण यांची माहिती

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई,12 फेब्रुवारी 2024:

कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यपदाचा तसेच विधिमंडळ सदस्यपदाचा आज राजीनामा दिला आहे. पुढील दोन दिवसात आपण आपली पुढची राजकीय भूमिका जाहीर करू अशी माहिती माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी आज पत्रकारांना दिली.

कॉंग्रेसमध्ये होतो तेव्हा कॉंग्रेस पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले आहे. मला कोणाबद्दल तक्रार करायची नाही. कोणाबद्दल व्यक्तिगत बोलायचे नाही. आता काही अन्य पर्याय पहावेत असे वाटल्याने मी राजीनामा देत आहे.प्रत्येक गोष्टीला काही कारण असतेच असे नाही. राजीनामा देणे हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. पक्षांतर्गत ज्या बाबी आहेत त्या आपण जाहीरपणे बोलणार नाही असेही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आज आपल्या पक्ष सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. चव्हाण हे भोकर विधानसभा मतदारासंघातून कॉंग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले होते. चव्हाण यांनी आज सकाळी आमदारकीचा राजीनामा दिला आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तो स्वीकारला आहे.

आज काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याशी किंवा आमदाराशी मी बोललो नाही. हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो. काँग्रेसच्या एकाही आमदाराशी माझे बोलणे झालेले नाही, असेही चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.

———————————————————————————————-