शासन आपल्या दारी’ उपक्रमाला नवी मुंबईकर नागरिकांचा ठिकठिकाणी उत्तम प्रतिसाद  

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 29  जानेवारी 2024

महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा यादृष्टीने ‘योजना कल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी’ हे उद्दिष्ट घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभरात सुरू असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाला नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात नागरिकांचा मोठया प्रमाणावर उत्स्फुर्त  प्रतिसाद लाभत  आहे.

महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे अतिशय उत्तम नियोजन 28 ठिकाणी करण्यात आले असून 20 जानेवारी रोजी दिघ्यापासून सुरु झालेल्या या उपक्रमामध्ये आतापर्यंत 11 ठिकाणी साडेतीन हजाराहून नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होत विविध योजनांची माहिती व लाभ घेतला आहे.

6 फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या या अभियानामध्ये 20 जानेवारी रोजी पहिल्याच दिवशी सकाळच्या सत्रात दिघा तलाव येथे 394 तसेच दुपारच्या सत्रात ईश्वरनगर दिघा येथे 551 नागरिकांनी उपक्रमाचा लाभ घेतला.

23 जानेवारी रोजी ऐरोली विभाग कार्यालय येथे 300 जणांनी तसेच दुपारच्या सत्रात नमुंमपा शाळा क्रमांक 53, चिंचपाडा येथे 250 नागरिकांनी उपक्रमातील योजनांच्या स्टॉलला भेट दिली.

24 जानेवारी रोजी नमुंमपा शाळा क्रमांक 48 सेक्टर -6 दिवा ऐरोली येथे 270 नागरिक तसेच दुपारच्या सत्रात आर आर पाटील मैदान सेक्टर 15 ऐरोली येथे 230 नागरिक सहभागी झाले.

25 जानेवारी रोजी सकाळच्या सत्रामध्ये घणसोली विभागातील नमुंमपा शाळा क्रमांक 55 राजर्षी छत्रपती शाहू महाराज विदयालय आंबेडकर नगर रबाळे येथे  510 नागरिकांनी उपस्थिती दर्शविली तसेच कै. बालाजी आंबो पाटील शाळा क्रमांक 42, घणसोली येथे 220 नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घेतला.

27 जानेवारी रोजी नमुंमपा समाज मंदीर सेक्टर 7 घणसोली येथे सकाळच्या सत्रात 170 नागरिक उपस्थित होते. तसेच दुपारच्या सत्रात नमुंमपा रात्र निवारा केंद्र येथे 205 नागरिक योजनांचा लाभ घेण्यासाठी उपस्थित होते.

 29 जानेवारी रोजी सेक्टर 11 बोनकोडे कोपरखैरणे येथील नमुंमपा शाळा क्रमांक 94 सीबीएससी माध्यम येथे  510 नागरिकांनी उत्साहाने उपस्थित राहत योजनांना प्रतिसाद दिला. समाजविकास विभागाचे उप आयुक्त किसनराव पलांडे, परिमंडळ 2 चे उप आयुक्त डॉ श्रीराम पवार, कोपरखैरणे विभागाचे सहाय्यक आयुक्त  सुनिल काठोळे तसेच शासनाचे अधिकारी, कर्मचारी यांनी सुयोग्य नियोजन केले. विविध शासकिय योजनांप्रमाणेच या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचे स्टॉलही प्रदर्शित करण्यात आले होते.  याप्रसंगी माजी नगरसेवक  लिलाधर नाईक व  वैशाली नाईक तसेच इतर लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित राहून आपल्या घरापर्यंत योजना घेऊन येणाऱ्या शासन आपल्या दारी उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

20 जानेवारी ते 6  फेब्रुवारी या कालावधीत आठही विभाग कार्यालय क्षेत्रातील  28 ठिकाणी  दररोज सकाळ व दुपार अशा दोन सत्रात शासन आपल्या दारी हा उपक्रम संपन्न होणार आहे. उदया 30 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 1 या सत्रात नमुंमपा शाळा क्रमांक 33 पावणे गाव तसेच दुपारच्या सत्रात दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत नमुंमपा शाळा क्रमांक 40, महापे या ठिकाणी हा उपक्रम आयोजित केला जात आहे. 31 जानेवारी रोजी तुर्भे विभाग कार्यालय येथील तळमजल्यावरील सभागृह या ठिकाणी सकाळच्या सत्रात तसेच सेक्टर 21 तुर्भे येथील आयसीएल शाळेचे मैदान व सभागृह या ठिकाणी हा उपक्रम राबविला जाणार आहे.

========================================================

========================================================