- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 25 जानेवारी 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सिडको महागृहनिर्माण योजना दिवाळी – 2022 मधील बामणडोंगरी घरांच्या किंमती 6 लाखांनी कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यशस्वी अर्जदारांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणा-या अनुदानाच्या लाभासह अंदाजे 27 लाख रुपयांत घरे मिळणार आहेत. सिडको प्रशासनाने याबाबतची घोषणा केली आहे.
सिडकोची घरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार सिडको महागृहनिर्माण योजना दिवाळी – 2022 मधील बामणडोंगरी, उलवे, नवी मुंबई येथील घरांच्या (सदनिका) किंमती रु. 6 लाखांनी कमी करण्याचा निर्णय सिडको महामंडळाकडून घेण्यात आला आहे. यामुळे मूळ रु. 35 लाख 30 हजार किंमतीची सदनिका रु. 29 लाख 50 हजार या किंमतीला उपलब्ध होणार आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उपलब्ध असलेल्या रु. 2.5 लाख रक्कमेच्या अनुदानामुळे यशस्वी अर्जदारांना ही सदनिका केवळ रु. 27 लाख या किंमतीला उपलब्ध होणार आहे. सिडको महागृहनिर्माण योजना दिवाळी – 2022 मधील बामणडोंगरी, उलवे येथील यशस्वी अर्जदार हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उत्पन्न मर्यादा रू. 3 लाखापर्यंत असल्याने घरासाठी रु. 35 लाखांची रक्कम उभी करण्यासाठी अर्जदारांना अडचणी येत होत्या. हे लक्षात घेऊन या अर्जदारांना दिलासा देण्याकरिता बामणडोंगरी येथील सदनिकांच्या किंमती कमी करण्याबाबतचे निर्देश सिडकोला देण्यात आले होते. त्यानुसार या सदनिकांच्या किंमती तब्बल रु. 6 लाखांनी कमी करण्यात येऊन, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मिळणाऱ्या रु. 2.5 लाख रक्कमेच्या अनुदानासह प्रत्यक्षात या सदनिका अंदाजे रु. 27 लाख किंमतीला उपलब्ध होणार आहेत.
सिडको महामंडळामार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अर्जदारांकरिता महागृहनिमार्ण योजना दिवाळी 2022 राबविण्यात आलेली होती. 17 फेब्रुवारी 2023 रोजी सदर योजनेची संगणकीय सोडत काढण्यात आली असून एकूण 4869 अर्जदार बामणडोंगरी येथील गृहप्रकल्पासाठी विजेते ठरले होते.
यशस्वी अर्जदारांना इरादापत्रे पाठविण्यात आलेली असून, अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी व वाटपपत्र निर्गमन प्रक्रिया अंतिम टप्यामध्ये आहे. यामुळे यशस्वी अर्जदारांना लवकरच सदनिकांचा ताबा मिळणे शक्य होणार आहे.
========================================================
========================================================
========================================================