३१ मार्च २०२५ ला नवी मुंबई विमानतळ वरून पहिले विमान उडणार

केंद्रिय नागरी उड्डाण मंत्री ज्योतीरादित्य सिंदिया याची पत्रकार परिषदेत माहिती

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंंबई, 14  जानेवारी, 2024 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या कामाला २०१८ मध्ये सुरूवात झाली. आता ३१ मार्च २०२५ ला पहिलं व्यावसायिक उड्डाण होईल अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतीरादित्य सिंदिया यांनी शनिवारी नवी मुंबईत दिली. उलवे इथल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या जागेवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

(फोटो ः सचिन हरळकर)

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प हा केवळ मुंबई, महाराष्ट्राचा प्रकल्प नाही तर संपूर्ण देशासाठी गौरवाचा प्रकल्प आहे. त्यामुळे आज एक तास या प्रकल्पाच्या कार्यपध्दतीचं सर्वेक्षण केलं आहे. दरमहिना या प्रकल्पाचं सर्वेक्षण केलं जातं. आज आढावा बैठकीत या प्रकल्पाचं सर्व काम वेळेनुसार सुरू असल्याचं आढळून आलं त्याबद्दल समाधान असल्याचंही ते म्हणाले. या विमानतळाचं काम २०२४ ला पूर्ण होणार होतं मात्र दळणवळणाच्या अनेक माध्यमांनी जोडणे आवश्यक आहे त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. विमानतळाचा हा प्रकल्प मुंबई जवळ उत्तम दळणवळण होईल ही विचारधारा लक्षात घेवून पाच भागांत हा प्रकल्प आकाराला येत आहे. प्रत्येक विमानतळ प्रधानमंत्री गती शक्ती योजनेनुसार जोडायचे आहे. त्यानुसार हे नवी मुंबई विमानतळ रेल्वे मार्ग, रस्ते मार्ग, पाणी मार्गाने जोडले जाणार आहे. विमानतळाची एका दिशा एनएच फोर बी ला जोडली जाणार आहे. तसंच अटल सेतू ची कनेक्टिव्हिटी अतिशय महत्वाची आहे. मुंबईतून कुलाबा इथून हॉवरक्राप्ट आ़णि रायगड मधून काग्रो मार्गाने हे विमानतळ जोडले जाणार आहे. विमानतळाच्या नामकरणाबाबत चा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळ घेतील अशी माहितीही केंद्रीय मंत्री सिंदिया यांनी दिली.

माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतीरादित्य सिंदिया यांचे नवी मुंबई विमानतळ परिसरात स्वागत केले.

(फोटो ः सचिन हरळकर)

यावेळी आ.प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी,  माजी खा. संजीव नाईक, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

========================================================

========================================================