- स्वप्ना हरळकर/अविरत वाटचाल
- नवी मुंबई, 7 जानेवारी2024
आठवडाभारापूर्वी नवीन वर्ष सुरू झाले आहे. या नवीन वर्षात अनेक नवीन प्रकल्प सुरू होतील. नवीन प्रकल्पांची घोषणा होईल. मात्र या नवीन प्रकल्पांची घोषणा होत असताना समस्त कोकणकर मात्र आमचा मुंबई- गोवा महामार्ग यंदा तरी पूर्ण होईल याचीच चिंता करत असतील. गणपतील, होळीला कोकणात जाताना आता थोडेसे सहन करूयात यंदा हा मार्ग पूर्ण होईलच मग आपला प्रवास सुसाट अशी भाबडी आशा बाळगत होते. गेल्या 13 वर्षांपासून रखडलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचा कामाबाबात आता तर न्यायालयानेही नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालय या महामार्गाच्या कामाबाबत वारंवार फटकारत असूनही यंत्रणेला त्याचे गांभीर्य उरलेले नाही की काय अशी सर्वसामान्यांची भावना आहे.
या महामार्गातला रायगड जिल्हयातला खूप मोठा भाग अजूनही अपूर्ण आहे तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही भागांत तर चौपदरीकरणाच्या कामाचा ठावठिकाणाच नाही. टप्याटप्याने पूर्ण होणा-या या महामार्गाच्या कामाचे किती टप्पे पूर्ण झाले आहेत याची माहिती तरी किमान नागरिकांना द्यावी अशी मागणी स्थानिकांकडून वारंवार होत आहे. ज्या भागात चौपदरीकरणाच्या कामासाठी रस्ते खोदले आहेत तिथे तर धूळ आणि खड्डे यांचे प्रमाण तर भयानक आहे. काही ठिकाणी दोन रस्ते जोडण्यासाठी जो मधला भाग जोडला गेला आहे तो उंच सखल करून सोडून दिल्यासारखा आहे. किमान दोन कॉंक्रीट रस्ते जोडताना वाहने रस्त्यावर आदळणार नाहीत याचीतरी काळजी घेतली पाहिजे.रायगड जिल्हयात अनेक ठिकाणी दिशादर्शक बोर्डच नसल्यामुळे अनेक वाहनचालकांना अपूर्ण रस्त्यावर वाहन चालवावे लागते ज्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. महामार्गाच्या कामामुळे बदललेले वाहतूक मार्गांची माहिती किमान दोनशे मीटर आधी मिळायला हवी. भोस्ते घाटातल्या तीव्र स्वरूपाच्या उतारावर तब्बल पंधरा ठिकाणी स्पीड ब्रेकर लावण्यात आले आहे. या स्पीड ब्रेडमध्येही खड्डे आहेत. त्यामुळे वाहन चालवताना चालकाला अती सावध तर रहावे लागते मात्र या सर्व प्रकरांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
यंदा होणार, पुढच्या वर्षी होणार असे करता करता आता दोन पिढ्या हा महामार्ग पूर्ण होण्याची वाट पाहात आहे. आता सरकारने डिसेंबर 2024 ची अंतिम मुदत दिली आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची अवस्था तारखांवर तारखा अशी झाली आहे. आता एकच पण अंतिम तारखी सांगा आणि काम पूर्ण करा. कोकणी जनतेच्या सोशीकपणाची परिक्षा तरी किती घेणार. गणपतीपूर्वी एक मार्गिका पूर्ण होण्याचे आश्वासन तर पूर्ण झालेच नाही. काही काळापुरता कशेडी घाटातला बोगदा सुरू करण्यात आला होता. तो आता बहुदा यंदाच्या गणेशोत्वादरम्यान पूर्ण क्षमतेने सुरू होईल अशी आशा आहे. या एका मार्गिकेवरील सिमेंटचे काम उखडले गेले आहे त्यामुळे एका बाजूला सिमेंटचा उखडलेला रस्ता आणि दुस-या बाजूला पूर्णपणे उखडलेला रस्ता असा प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठित घेवून प्रवास करावा लागत आहे. ही अवस्था संपूर्ण महामार्गाची नसली तरी ज्या भागात आहे तिथे परिस्थिती खूप गंभीर आहे. या महामार्गावरची एक चांगली बाजू म्हणजे अनेक ठिकाणी वळणे कमी करण्यात आली आहेत किंवा काही भागांत वळणावरील रस्ता वाढवण्यात आला आहे. कधी चांगला रस्ता तर कधी थेट खड्डा, धूळ, माती, खडी यांमधून खडखड करत जाणार रस्ता असा विरोधाभास याचा अनुभव केवळ याच महामार्गावर मिळतो.
रस्ता हे दळणवळणाचे माध्यम मानले जाते. कोकणातले रस्ते जोपर्यंत चांगले आणि सुस्थितीत होत नाहीत तोपर्यंत कोकणातल्या अनेक भागांमधे पर्यटन, त्याच्याशी संबंधित रोजगार आणि पर्यायाने आर्थिक उन्नती होणे कठिण आहे.
========================================================
========================================================